तालुक्यातील आंब्याच्या झाडांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:00 AM2021-01-02T00:00:05+5:302021-01-02T00:00:11+5:30
श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या ...
श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या कीटकांमुळे आंब्याच्या फुलांना आणि पानाला धोका निर्माण होत आहे.
तुडतुड्या कीटक फुलातील व पानातील रस शोषून घेतात, त्याकारणास्तव आंब्याची पाने व येणारा मोहोर कमी प्रमाणात येतो. तुडतुड्या कीटक पानांच्या पाठीमागील भागात वास्तव्य करतात. तुडतुडे अतिशय चंचल व एका पानावरून दुसऱ्या पानावर सदैव भ्रमंती करतात. थंडीच्या कालावधीमध्ये सुप्तावस्थेत असतात. मात्र, थंडीचे थोडे प्रमाण कमी झाल्यास ते पूर्ण क्षमतेने पानातील रस शोषून घेतात. योग्य उपाययोजना न केल्यास आंब्याची पाने पिवळी पडल्यानंतर काही अंशी गळण्यास सुरुवात होते.
कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी अगोदरच त्रासलेला आहे. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील शेकडो हेक्टर पिके जमीनदोस्त केली. अनेक वर्षांपासून शेतकऱ्याला आंब्याच्या पिकाद्वारे उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास अंदाजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त आंब्याची झाडे वादळात नुकसानग्रस्त झाली आहेत. उर्वरित आंबा कसाबसा वादळापासून वाचला आहे. उभ्या असलेल्या आंब्यालासुद्धा वादळाचा बऱ्याच अंशी फटका बसला आहे. अशा कठीण प्रसंगी आंब्याकडून आगामी काळात उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. कीटकाचा वाढलेला प्रादुर्भाव चिंता वाढवणारा आहे.