'एका क्लिकवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्सची माहिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:05 PM2021-04-23T22:05:28+5:302021-04-23T22:11:16+5:30
रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्ये दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा समुह संर्सग झाल्याचे आकडे वारीवरुन दिसून येते.
रायगड - जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली आहे. रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सीजन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ हाेते. यातून आता सुटका होणार आहे. एका क्लिकवरच सर्व माहिती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वीत केली आहे.
रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्ये दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा समुह संर्सग झाल्याचे आकडे वारीवरुन दिसून येते. वाढत्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये वेळेवर बेड उपलब्ध होत नाही. कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड शिल्लक आहेत. हे प्रत्यक्षात तेथे गेल्यावरच रुग्णांच्या नातेवाईकांना कळते. त्यामुळे बेड उपलब्ध नसल्याने त्यांची चांगलीच दमछाक होते आणि रुग्णांचेही हाल होतात. नागरिकांना आरोग्य व्यवस्थेबाबतची माहिती तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून "रायगड जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली" (डॅशबोर्ड) कार्यान्वित केली आहे.
एका क्लिकवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबण्यास मदत मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in या वेबसाईटवर www.covid19raigad.in ही url लिंक संलग्न केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या तसेच अन्य अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सरकारी वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची, सरकार निर्णयाची, विविध सरकारी आदेशांची इत्यंभूत माहितीही देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.