- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी आगीच्या घटना घडत असल्याने भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील घरभाड्याच्या रकमेतही कमालीची वाढ झाली आहे. यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून देखील अनेकांनी बैठ्या चाळीतल्या तसेच गावठाणातील घरांची पुनर्बांधणी करून छताची जागा भाड्याने देण्याला सुरवात केली आहे. ४ ते ६ हजार रुपये महिना भाड्याने हे टेरेस दिले जात आहेत, तर काही सोसायटीधारकांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबासाठी टेरेसचा वापर खुला केला आहे. परंतु छतांचा रहिवासी वापर भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच घटना सोमवारी दुपारी तुर्भे सेक्टर २२ येथे घडली. वेळीच आगीवर नियंत्रण आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.काही अंतरावरच असलेल्या तीन इमारतींच्या छताचा रहिवासी वापर केला जात होता. त्यापैकी एका छतावर लागलेली आग पसरल्याने तीनही इमारतींच्या छतावर अग्नितांडव सुरू झाले होते. यावेळी प्लॅस्टिकची पाण्याची टाकी वितळल्याने त्यातल्या पाण्यामुळे काही प्रमाणात आग पसरण्याचे थांबले. शिवाय वेळीच अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र या घटनेवरून छतांवरील रहिवासी वास्तव्याला धोक्याची घंटा मिळाली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात छतांचा रहिवासी वापर होत असतानाही, सर्वच प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उद्भवत आहे. काही ठिकाणी कॅटरिंगच्या व्यवसायाकरिता स्वयंपाक करण्यासाठी छतांचा वापर होत आहे. पावसाचे पाणी छतामधून पाझरू नये या कारणाखाली बहुतांश छतांवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या शेडखाली चाललंय काय याचा शोध घेण्याचाही प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून झालेला नाही. दारूच्या खासगी पार्ट्या, जुगाराचा अड्डा यासाठी देखील छत वापरले जात आहेत.अशा काही ठिकाणांवर पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंबंधीची चौकशी देखील सुरू केली होती. मुंढेंच्या बदलीनंतर मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुनर्बांधणी अथवा गरजेपोटीच्या नावाखाली व्हर्टिकल बांधकामे वाढत आहेत. जास्त जागा व्यापण्यासाठी पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर इमारतींचा आकार बदलला जात आहे. यामुळे एकाला एक चिटकून इमारती उभ्या राहत असल्याने एखाद्या दुर्घटनेत त्याठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची सुटका करणे अथवा अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोचणे अडचणीचे ठरणार आहे.
छतांचा रहिवासी वापर ठरतोय धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:13 AM