जिल्ह्यात निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात; कुष्ठरोग निर्मूलनाकरीता जिल्हा कृती नियोजन आराखडा तयार
By निखिल म्हात्रे | Published: October 2, 2023 08:47 PM2023-10-02T20:47:29+5:302023-10-02T20:48:25+5:30
२०२३-२४ मध्ये आत्तापर्यंत वर्षात २८९ रुग्ण उपचार घेत आहेत.
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून, जिल्ह्यात महात्मा गांधी जयंतीपासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग निर्मूलनाकरीता जिल्हा कृती नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट २०२७ पर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ८४५ नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचार देण्यात आले आहेत. तर २०२३-२४ मध्ये आत्तापर्यंत वर्षात २८९ रुग्ण उपचार घेत आहेत.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार क्षय रुग्णांसाठी निक्षय मित्र उपक्रम देशात राबविला जात आहे. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात कुष्ठरुग्णांसाठी रायगड निकुष्ठ मित्र उपक्रम हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अज्ञानामुळे कुष्ठरोगाबद्दल असणारा भेदभाव कमी करणे हा आहे. रायगड निकुष्ठ मित्र म्हणून पुढे आलेले स्वयंसेवक नियमित उपचार घेणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या घरी जाऊन सदरील रुग्णाला अन्नाची टोपली भेट म्हणून देतात. यामध्ये प्रामुख्याने भात, धान्य, डाळी, फळे यांचा समावेश असतो. अन्नाची टोपली दिल्यानंतर सदरील रुग्णाच्या घरी, रुग्णासोबत बसून ते प्रातिनिधिक स्वरूपात चहा, नाश्ता, किंवा जेवण करतील. या करिता सर्वप्रथम रुग्णाची आणि रुग्णच्या नातेवाईकांची सहमती घेतली जाणार असून, या चहा पानासाठी रायगड निकुष्ठ मित्रा सोबत त्या गावातील लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, शासकीय कर्मचारी, इत्यादी व्यक्ती उपस्थित राहतील. उपचार घेत असलेले रुग्ण हे इतरांना आजाराचा प्रसार करीत नसतात. आशा प्रकारच्या चहापानामुळे कुष्ठ रुग्णाबद्दल होणारा भेदभाव कमी होण्यास नक्की मदत होणार आहे.
रायगड निकुष्ठ मित्र म्हणून स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच सहाय्यक संचालक आरोग्य (कुष्ठरोग) डॉ. प्रताप शिंदे यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १०९ रायगड निकुष्ठ मित्राची नोंदणी झाली आहे. जास्तीस्त जास्त स्वयंसेवकांनी रायगड निकुष्ठ मित्र म्हणून पुढे यावे आणि कुष्ठरोग दुरीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आहवान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी केले आहे.