म्हसळा : दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत जाऊन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ठाकरोली सारख्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, अशा परिस्थितीत चिमण्या-पाखरांच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार ही फार मोठी समस्या उद्भवली असताना सुट्टीच्या कालावधीत ती जबाबदारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारून भूतदयेचा स्वीकार केला आहे.
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ठाकरोली शाळेतील शिक्षक व विद्यार्थी नेहमीच विधायक योजना राबवितात. अनेक उपक्रम या शाळेच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविले जातात. शाळा व शाळेच्या परिसरात अनेक पक्षी, पाखरे, चिमण्या यांचा सातत्याने वावर होत असतो, त्यांचे संवर्धन म्हणजे फार मोठी जबाबदारी. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन पजई, शिक्षक धनेश अधिकारी, शरद कोद्रे, जीवन राठोड आणि शाळेतील विद्यार्थी यांनी प्लॅस्टिकचे छोटे ड्रम, प्लॅस्टिक बाटल्या, जग यांना मधोमध कापून त्यातून असे साहित्य तयार केले की त्यामध्ये चिमण्या-पाखरांसाठी खाऊ, पाणी ठेवता येते. या तयार केलेल्या कलाकृती झाडांना, शाळेच्या भिंती, खिडक्या यावर टांगून ठेवल्या आहेत.
सर्व शाळांनी हा उपक्रम राबविला तर प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांचे निश्चितपणे संवर्धन होईल व चिमण्या-पाखरांच्या संख्येत आमूलाग्र वाढ होईल. या पूर्वीही आमच्या शाळेने अनेक उपक्र म राबविले असून, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असून, पाष्टी केंद्राच्या माजी केंद्रप्रमुखांची प्रेरणा आहे. - पजई, मुख्याध्यापक
म्हसळ्यातील जिल्हा परिषद शाळा ठाकरोलीचे शिक्षक व विद्यार्थी नेहमीच विधायक उपक्रम राबवितात. शाळेची गुणवत्ताही उत्तम असून, शाळेने राबविलेल्या उपक्रमातून तालुक्याचे नावलौकिक वाढले आहे. - बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य
या उपक्रमांमुळे केवळ पक्ष्यांचे संवर्धन होत नसून, परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी-पक्ष्यांत वाढ होत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. - छाया म्हात्रे, सभापती, पंचायत समिती म्हसळा