आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:32 AM2020-07-29T00:32:55+5:302020-07-29T00:33:04+5:30

आॅनलाइन शिक्षण शक्य नाही : गजानन जाधव घरोघरी जाऊन देत आहेत शिक्षणाचे धडे

Initiatives for the study of tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढाकार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढाकार

googlenewsNext

गिरीश गोरेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांकडे मोबाइल सुविधा नसल्याने त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. रोहा तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील चिंचवलीतर्फे आतोने शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हा प्रश्न शाळेचे मुख्यध्यापक गजानन जाधव यांनी सोडविला आहे. गजानन जाधव हे डोंगर, दऱ्या, नदी पार करून भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास घेत आहेत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षण घेता येत नसले, तरी गजानन जाधव यांच्यासारखे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाच्या माध्यमातून आॅफलाइन अभ्यास शिकवत आहेत.
रोहा तालुक्यात चिंचवलीतर्फे आतोने येथे दुर्गम क्षेत्रात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ६३ जणांचा विद्यार्थी पट आहे. ही शाळा डोंगर-दऱ्यांच्या कुशीत असून, निसर्गाच्या सान्निध्यात आहे. गजानन जाधव हे मुख्यध्यापक असून, जगन्नाथ अब्दागिरे हे एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात शाळेची पूर्ण इमारत कोसळली आहे. त्यामुळे गावातील मंदिरात शाळेचे साहित्य ठेवण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाबरोबर कोरोनाचे संकटही असल्याने सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने मुलांच्या शिक्षणाचा तोटा होऊ नये, यासाठी आॅनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे.
चिंचवलीतर्फे आतोने ही शाळा दुर्गम भागात असून, या ठिकाणी मोबाइलला रेंज नाही. त्यातच विद्यार्थ्यांचे पालक हे निरक्षर असून, त्यांच्याकडे मोबाइल ही नाहीत. त्यामुळे या आदिवासी वाडीवरील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकेही देण्यात आली असली, तरी पालक हे निरक्षर असल्याने अभ्यास घेणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यध्यापक गजानन जाधव यांनी आपले शिक्षक सहकारी जगन्नाथ अब्दागिरे यांच्या मदतीने आदिवासी वाडीवर येऊन विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास घेत आहेत.

चिखलातून होतोय प्रवास
घरापासून दहा किलोमीटरवर असलेली दुर्गम शाळा डोंगर-दºया, नदी ओलांडून पावसात चिखलात रस्ता पार करून हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत आहेत. त्यामुळे आदिवासी वाडीवरील शाळेतील विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसले, तरी गजानन जाधवसारखे शिक्षक हे शिक्षणामध्ये एक आदर्श निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मी आणि माझे शिक्षक रोज या मुलांचा अभ्यास घेत असल्याचे गजानन जाधव यांनी सांगितले.

Web Title: Initiatives for the study of tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.