पुढाकार महिलांच्या आत्मसन्मानासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:42 PM2019-05-30T23:42:05+5:302019-05-30T23:42:21+5:30

दहा मास्टर ट्रेनर देणार मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे : जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार उपक्रम

Initiatives for women's self-respect | पुढाकार महिलांच्या आत्मसन्मानासाठी

पुढाकार महिलांच्या आत्मसन्मानासाठी

Next

आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेने महिलांचा आत्मसन्मान वाढावा आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी पाच अशा चार हजार ३० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी दहा मास्टर ट्रेनर महिलांची टीम सज्ज करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेतलेली महिला आपापल्या गावात याबाबत जनजागृती करेल.

जग एकविसाव्या शतकाकडे झेपावत आहे, तरी मासिक पाळीविषयी समाजात उघडपणे चर्चा होताना दिसत नाही. महिलांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने समज-गैरसमज वाढतात. शहरांमध्ये महिलांच्या समस्येविषयी बºयापैकी जनजागृती झाल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागामध्ये, विशेषत: आदिवासी पाड्यांतील महिला आजही या विषयी अनभिज्ञ असल्याचे दिसते, त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

मुली आणि महिला सक्षम राहिल्यास कुटुंब, पर्यायाने समाज सक्षम राहणार आहे, म्हणूनच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी जनजागृतीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेने केल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.

मासिक पाळीच्या कालावधीत महिला/मुलींचे मनोधैर्य वाढवणे, त्यांच्या कामाचा ताण कमी करणे यासाठी घरातील पुरुषांनी पुढे आले पाहिजे, असे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले. पहिल्या मासिक पाळीबाबत फक्त १३ टक्के मुलींनाच माहिती आहे, तर उर्वरित मुलींना याबाबत ज्ञान नसल्याने त्या घाबरतात. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर त्या स्वत:च त्यांच्या आरोग्याची शास्त्रीय पद्धतीने काळजी घेतील, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

१० मास्टर ट्रेनर देणार प्रशिक्षण
रायगड जिल्ह्यात ८०६ ग्रामपंचायती आहेत. येथील ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीचे व्यवस्थापन आणि त्याचे महत्त्व समजावे यासाठी दहा मास्टर ट्रेनरची टीम सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी आणि संबंधित ग्रामपंचायतीमधील विद्यमान महिला सदस्य अशा पाच महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पाच महिला देणार व्यवस्थापनाची माहिती
दहा मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण घेतलेल्या पाच महिला त्यांच्या गावातील अन्य महिला आणि मुलींना मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करावे, त्याबाबतचे समज-गैरसमज, कोणती काळजी घ्यावी हे शिकवणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाणे, गावातील मुली/महिलांना एकत्र करून प्रशिक्षण देणार आहे.

शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्रात पॅडबँक
आजही मुली आणि महिला मेडिकल स्टोअरमधून सॅनिटरी पॅड विकत घेताना संकोचतात. काही महिला आणि मुली जुन्या पद्धतीचाच अवंलब करतात. त्यांच्या सोयीसाठी शाळा, ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्यकेंद्रातच पॅडबँक उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या पॅडबँकेतून मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार असल्याने महिलांची कुचंबणा, संकोच दूर होण्यास मदत होईल.

३०-४० टक्के विद्यार्थिनी गैरहजर
मासक पाळीच्या व्यवस्थापनाचे ज्ञान नसल्याने सुमारे ३०-४० टक्के विद्यार्थिनी या दरम्यान शाळेत गैरहजर राहतात, त्यामुळे चार दिवसांचा त्याचा अभ्यास बुडतो. यावर उपाययोजना म्हणून शाळेतील एका खोलीत विद्यार्थिनीसाठी ‘रेस्ट रूम’ उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखा, डस्टबीन, हॅण्डवॉश, टेबल, खुर्ची, आराम करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून, कंपनीच्या सीएसआर फंंडातून अशा रेस्टरूम प्रत्येक शाळेत उभारण्यात येणार आहेत.

Web Title: Initiatives for women's self-respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला