महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी
By वैभव गायकर | Published: December 28, 2023 05:08 PM2023-12-28T17:08:33+5:302023-12-28T17:09:55+5:30
पनवेल मधील के गो लिमये वाचनालयाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात.
वैभव गायकर,पनवेल: शिवाजी महाराजांच्या मराठीवर केंद्र सरकार अन्याय करीत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याची गरज आहे.याबाबत केंद्रांची मंजुरी आवश्यक आहे.मात्र ती मिळत नसल्याने जेष्ठ साहित्यिक प्रा.श्रीपाल सबनीस यांनी नाराजी व्यक्त केली.दि.28 रोजी पनवेल मधील के गो लिमये वाचनालय व ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पनवेल मधील जेष्ठ नागरिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यावेळी बोलताना सबनीस यांनी के गो लिमये वाचनालयाचे कौतुक केले.ग द मांडगुळकर यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले होते.आज या वाचनालयाचे 1800 सदस्य आहेत.याबाबत देखील सबनीस यांनी वाचनालयातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.पुढे त्यांनी वाचनालयाचे अनुदान बंद केलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशी विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.मराठी हि भाकरीची भाषा व्हावी तरच मराठी टिकून राहील.देवाची ,धर्माची निष्ठा सोडत नाही तशीच सत्याची निष्ठा जोपासली पाहिजे. राजकीय व्यवस्थेचे दिवाळे निघाले आहेत. ग्रंथालय जिवंत करा तरच आम्ही मतदान करू अशी अट घालण्याची गरज असल्याचे सबनीस म्हणाले.
कार्यक्रमाचे उदघाटक रामशेठ ठाकुर यांनी देखील वाचाल तर वाचाल असा संदेश देत.के गो लिमये वाचनालय पनवेलचे वैभव असल्याचे सांगितले.वाचनालयाच्या नव्या ईमारतीच्या उभारणीला त्यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली.सकाळी के गो लिमये वाचनालय ते जेष्ठ नागरिक सभागृहा पर्यंत ग्रंथदिंडी काढुन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमर वार्डे यांनी देखील वाचन संस्कृती अधिक रूढ होण्याची गरज व्यक्त केली.