ग्रामीण विकासाच्या ब्ल्यू प्रिंटची शाई सुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:09 AM2021-03-07T01:09:25+5:302021-03-07T01:09:45+5:30
श्रीवर्धन तालुक्यात ग्रामसभाच नाहीत : राज्य सरकारची संमती, तरी ग्रामपंचायती मात्र उदासीन
गणेश प्रभाळे
दिघी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या ग्रामसभा म्हणजे ग्रामीण विकासाची ब्ल्यू प्रिंटच आहे मात्र या सभा घेण्यात ग्रामपंचायतींमध्ये उदासीनता दिसून येत आहे. सध्या शासनाकडून ग्रामसभेला परवानगी मिळाली असून, श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून अद्याप ग्रामसभा घेतल्या गेल्या नाहीत. परिणामी, ग्रामीण विकासाच्या ब्ल्यू प्रिंटची शाई खुंटली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक वित्तीय वर्षात चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. सध्या कोरोनामुळे देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले असून, बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभा न चुकता घेण्यात याव्यात, अशी सूचना आहे. मात्र या नियमाकडे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झालेले आहे. कोरोनाविषयक नियम पाळून ग्रामसभा सुरू करण्यास राज्य सरकारची संमती असून, श्रीवर्धन तालुक्यात ग्रामसभाच नाही. ग्रामसभेच्या मंजुरीअभावी अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. विशेषतः तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर नव्याने झालेल्या सरपंचांनी कारभार हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ग्रामसभांच्या आयोजनाला दिलेल्या परवानगीचे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे विकासाच्या कामकाजाची आखणी करण्यापूर्वी ही सभा घेणे महत्त्वाचे आहे. या ग्रामसभांमध्ये मुख्यतः कोणते विषय चर्चेला घ्यावेत व मंजुरी घेऊन ग्रामसभेचे कामकाज पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्रामसभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात, ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय मंजूरही करावे लागतात. असे असतानादेखील तालुक्यातील ग्रामपंचायतकडून ग्रामसभा होते की नाही, याबद्दल साशंकता उपस्थित केली जाते. तालुक्यातील ग्रामसभेबाबत श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी उद्धव होळकर यांना संपर्क केला असता, मिटिंगमध्ये असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला.
ग्रामसभेची मागणी
रेंगाळलेल्या प्रश्नांसाठी कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात ग्रामसभेसारख्या महत्त्वपूर्ण कामकाजाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करत आहेत, असे प्रश्न सामान्य जनता विचारत आहेत. गेल्या महिन्यातील ता. ११ फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली असली, तरी श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा झाल्याच नाहीत.
फिरता ग्रामसेवक
श्रीवर्धन तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी दिघीगण क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा कारभार अद्यापपर्यंत अतिरिक्त भार म्हणून ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आले आहे. कित्येक ग्रामपंचायतींवर पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने वर्षभर तात्पुरत्या कारभारामुळे विकासाला खीळ बसली आहे.
सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड १९ च्या अनुषंगाने विविध नियमांचे काटेकोर पालन करून ग्रामसभा लवकरच घेण्यात येईल.
- प्रकाश तोंडलेकर,
उपसरपंच ग्रामपंचायत बोर्लीपंचतन