रायगडवरील ‘वाघ्या’चा पुतळा हटविणारे निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:20 AM2020-01-25T06:20:39+5:302020-01-25T06:20:56+5:30
रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २०१२ साली हटवला होता.
अलिबाग : रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २०१२ साली हटवला होता. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. माणगाव सत्र न्यायालयात या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. पुराव्याअभावी ७३ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा जगदीश्वर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे आहे. २०१२ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी काही तासांतच कार्यकर्त्यांना अटक केली होती. महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला होता. आठ वषार्नंतर या खटल्याचा निकाल लागला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.