पालघर : माहिम ग्रामपंचायत अंतर्गत नवोदय विद्यालयाजवळ सर्व्हे नं. ८३७/१ या पैकी काही जमीनींवर महसूल विभागाच्या नावावर टिच्चून नालासोपारा, वसई भागातील काही भूमाफीयांनी बेकायदेशीररित्या चाळी उभ्या करण्याचे काम हाती घेतले आहे. या बेकायदेशीर खरेदी प्रक्रियेत सर्वसामान्य गरीब माणूस भरडला जात असल्याने या प्रकरणी राज्यपालांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.माहिम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या भूखंडावर राखीव व नवीन शर्तीच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहत असून विशेष म्हणजे महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संधान साधून ही बांधकामे उभी केली जात असल्याचे चित्र समोर येत आहे. यातील अनेक भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी दाखल केल्यानंतरच महसूल विभागाला जाग येऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते हे विशेष आहे. वडसई जवळील नवोदय विद्यालयाच्या जवळ आणि लॅडमार्क डेव्हलपर्स या सुनियोजित बांधकाम प्रकल्पाच्या समोरील सर्व्हे नं. ८३७/१ पैकी नवीन शर्तीच्या जमीनीवर मागील दोन महिन्यापासून बेकायदेशीररित्या छोट्याछोट्या खोल्यांच्या चाळीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहेत. घटनास्थळी जमीनीचे मालकापैकी कुणीही उपस्थित न राहता वसई, नालासोपारा भागातील काही लोक ही बांधकामे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बांधकामासंदर्भात परवानगी घेतल्या संबंधी विचारणा केल्यावर कागदपत्रे नसल्याचे घटनास्थळी उपस्थित व्यक्तीने सांगितले.(वार्ताहर)
नवोदय विद्यालयाजवळ बेकायदेशीर चाळींचे काम धडाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 1:44 AM