अलिबाग : अलिबाग येथील १४ वर्षीय प्रणव चंद्रकांत वाजे याने सोमवारी मोरा ते गेटवे आॅफ इंडिया हे १२ कि.मी. सागरी अंतर तीन तास २५ मिनिटांत उसळत्या सागरी लाटांवर स्वार होत यशस्वीरीत्या पार करून ख्रिसमस अनोख्या प्रकारे साजरा केला आहे.सोमवारी सकाळी ६ वाजता मोरा बंदरात प्रणव याने सागरात झेप घेतली आणि अत्यंत जिद्दीने ९ वा. २५ मि. वाजता त्याने गेटवे आॅफ इंडियाला हात लावून आपले ध्येय गाठले. विविध राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील विविध पारितोषिकांचे मानकरी आणि विक्रम प्रस्थापित करणारे अपंग जलतरणपटू विज्ञान मोकल, संदीप भोईर, मोहम्मद रियाज काद्री, संजय घरत व ओपन वॉटर जलतरण असोसिएशनचे सेक्रेटरी संतोष पाटील यांचे मार्गदर्शन प्रणव यास लाभले आहे.प्रणव हा अलिबाग येथील सेंट मेरीज स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी असून, त्याला चार वर्षांचा असल्यापासून पोहायची आवड आहे. विविध तालुका व जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यात त्याने यश मिळविले आहे. मोरा ते गेटवे प्रवासादरम्यान त्यांचे वडील डॉ. चंद्रकांत वाजे व आई बोटीतून त्यांच्या सोबत होते. अनोख्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करीत प्रणवने संपादन केलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.>मोरा ते गेटवे आॅफ इंडिया हे १२ कि.मी. सागरी अंतर पोहून पार करताना प्रणव चंद्रकांत वाजे.
अलिबागच्या प्रणव वाजेचा अभिनव विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:50 AM