विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ‘होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, मग तुम्ही का नाही’ अशा अनोख्या आवाहन अभियानाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हाती घेतले आहे. या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्र म, शिक्षणाचा दर्जा, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांना देण्यात येत आहे. त्याचबरोबरच जि.प. शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम बहुदा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.रायगड जिल्ह्यातील पालकांना स्वस्वाक्षरीचे पत्र देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा दाखलाच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर देत आहेत. प्रिय पालकांनो, तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवा. आपली जिल्हा परिषद शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कोठेही कमी नाही. किंबहुना ती अधिक सोयीयुक्त आहे असे आवाहन करणारा हा एक आगळावेगळा उपक्र म या वर्षापासून जि.प.च्या माध्यमातून नार्वेकरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी शेषराव बडे राबवित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी लिहिलेले हे पत्र वाचले असता निश्चितच या उपक्र माचे महत्व व त्यामागे असलेली भावना लक्षात येते. अशा प्रकारचे उपक्र म जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवून रायगड जिल्ह्यातील पालकांमध्ये जागृती होवून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल, असा विश्वास जि .प च्या शिक्षण विभागाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्रआपली मुलं हीच खरं तर आपली संपत्ती! त्यांच्यासाठी आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करीत आहात. आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं पर्यायाने देशाचंं नाव मोठं करावं असं आपलंही स्वप्न असेल ना? हे स्वप्न निश्चित साकार होईल. मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करायला हवी. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य आहे हे शिक्षणतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर पोहचलेले असंख्य अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, खेळाडू, इंजिनीअर्स, कलाकार, साहित्यिक, लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रात नमूद के ले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्यावृद्धीसाठी अभिनव उपक्रम
By admin | Published: June 15, 2017 2:38 AM