उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:53 PM2020-09-27T23:53:40+5:302020-09-27T23:53:57+5:30

अंधश्रद्धेमुळे फासला शेंदूर : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर!

Inscriptions in Uran taluka difficult | उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

googlenewsNext

मधुकर ठाकूर।

उरण : उरण तालुक्यात चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरांत अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अति पुरातनकालीन पाषाणातील दुर्मीळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असताना, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेले आहेत, तर अंधश्रद्धेमुळे देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चिरनेर येथील शिवमंदिराच्या उभारणीच्या कामासाठी उत्खनन सुरू होते. या उत्खननात शिलालेख सापडले होते. चिरनेर येथे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख शंकर मंदिराच्या तळ्याकाठी धूळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे, तर दुुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती येथील रहिवासी जीवन केणी यांनी दिली, तसेच असेच ऐतिहासिक शिलालेख कळंबुसरे येथील गावात तीन, तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर तर काही शिलालेख मंदिर परिसरात सापडले आहेत.

शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.
यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा
उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन
करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

१० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष
‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा प्रत्येक शिलालेख आणि शिल्प तीन टप्प्यांत विभागली गेली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात काही मजकूर कोरलेले दिसतात, तर खालच्या टप्प्यात एक गाढव महिलेवर आरूढ असल्याची कोरीव प्रतिमा दिसत आहे. अशी प्रतिमा आणि आलेख असल्यानेच या शिलालेखाला ‘गधेगळ’ नाव पडले असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. ते १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याचा निष्कर्षही इतिहास संशोधकांनी काढला आहे.

Web Title: Inscriptions in Uran taluka difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड