सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती कामाची पाहणी करत आहेत. पनवेल विश्रामगृह येथून मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला असून पलस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या पहिल्या टप्प्याची मंत्री चव्हाण यांनी पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गाचे काम सिमेंट बेस ट्रिटमेंट या अत्याधुनिक व नवं तंत्रज्ञान वापराने होत आहे.
गणेशोत्सवापूर्वी एका लेनचे काम पूर्णत्वास येईल व डिसेंबर पर्यंत दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होईल असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला होता. कामाचा दर्जा व गती याची आज चव्हाण यांनी पाहणी केली व अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या. दुसऱ्या टप्प्यात वडपाले ते भोगाव, भोगाव ते कशेडी, कशेडी ते चिपळूण असा त्यांचा पाहणी दौरा असणार आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विराेधी पक्षांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यातच रखडलेले काम आणि महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे यामुळे साेशल मीडियावरही खिल्ली उडविण्यात आली. ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेला हे काम चांगलेच चर्चेत राहिले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवून लवकरात लवकर महामार्ग पूर्णत्वाला नेण्याचे त्यांनी निर्देश दिले हाेते. त्यानंतर त्यांनी वारंवार या महामार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे.