शाकाहाराऐवजी दिले मांसाहाराचे पार्सल, पाच हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:44 AM2018-12-26T06:44:38+5:302018-12-26T06:45:14+5:30
आॅनलाइनद्वारे शाकाहारी जेवणाचे पार्सल मागितले असतानाही मांसाहारी जेवणाचे पार्सल दिल्याने व ते अन्न ग्रहण केल्याने ग्राहकाच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्याचे
मुंबई : आॅनलाइनद्वारे शाकाहारी जेवणाचे पार्सल मागितले असतानाही मांसाहारी जेवणाचे पार्सल दिल्याने व ते अन्न ग्रहण केल्याने ग्राहकाच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्याचे म्हणत अतिरिक्त मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने पाइसेस ई-सर्विसेस लि. आणि पोन्चो हॉस्पिटॅलिटी (बॉक्स-८) यांना राकेश अग्रवाल यांना पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले.
राकेश अग्रवाल यांनी १६ सप्टेंबर २०१६ रोजी पाइसेस ई-सर्विसेस लि. यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन शाकाहारी जेवणाची आॅर्डर दिली. अंधेरी येथील पोन्चो हॉस्पिटॅलिटी (बॉक्स-८) यांच्या डिलिव्हरी बॉयने त्यांची जेवणाची आॅर्डर घरपोच केली.
अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, ते व त्यांचे कुटुंबीय शाकाहारी आहेत व त्यातच पितृपक्ष सुरू होता. आपण शाकाहारी जेवणाची आॅर्डर देऊनही आपल्या घरी मांसाहारी जेवणाचे पार्सल देण्यात आले. ते अन्न चुकून ग्रहण करण्यात आले. पाइसेस ई-सर्विसेसने आणि पोन्चो हॉस्पिटॅलिटीच्या निष्काळजीपणामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या तक्रारीवर ‘पाइसेस’ आणि ‘पोन्चो’ यांनी आक्षेप घेतला. पाइसेस यांच्या म्हणण्यानुसार, अग्रवाल यांनी याबाबत तक्रार करताच त्यांच्या आॅडर्रचे संपूर्ण पैसे परत करण्यात आले व २०० रुपयांचे डिस्काउंट व्हाऊचर देण्यात आले. अग्रवाल यांनी आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी जाणूनबुजून तक्रार केली आहे. तर पोन्चो यांनी अग्रवाल हे आपले नियमित ग्राहक नसल्याचे मंचाला सांगितले. आम्ही पार्सलवर ‘मांसाहार’ व ‘शाकाहार’ असे लिहितो. डिलिव्हरी बॉयच्या चुकीमुळे पार्सलची अदलाबदल झाली. बिलावर हॉटेलचा फोन नंबर आहे. त्यामुळे अग्रवाल यांनी याबाबत तक्रार करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे काहीही केले नाही.
मात्र, जिल्हा ग्राहक मंचाने पाइसेस ई-सर्विस प्रा. लि. आणि पोन्चो हॉस्पिटॅलिटीने कर्तव्यात कसूर केल्याने व अग्रवाल यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांना पाच हजारांची नुकसानभरपाई, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले.