सार्वजनिक सभा, मेळाव्यांना परवानगी न देण्याच्या सूचना; जिल्हा प्रशासनाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:55 PM2020-03-13T22:55:32+5:302020-03-13T22:55:50+5:30
कोरोनाच्या बचावासाठी उपाययोजना
अलिबाग : देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या सभा, मेळावे अशा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू आजार हा मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित आहे. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया, मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी हवेद्वारे, शिंकण्या-खोकल्यातून तो पसरत असल्याने जागतिक आरोग्य संस्थेने या आजाराबाबत जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. संशियत रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात आले आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, या विषाणूची लागण एका संक्रमित रु ग्णाकडून अन्य व्यक्तीस, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता आहे.
कर्जतमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन
1) सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण सापडत असूनी आरोग्य यंत्रणादेखील सज्ज झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात विषाणू संसर्ग विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून यात सहा रुग्ण ठेवण्याची व्यवस्था असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सांगितले.
2) कक्षाच्या स्थापनेप्रसंगी गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत पोलीस निरीक्षक अरुण भोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकृष्ण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता दळवी, औषध निर्माण अधिकारी ज्ञानेश्वर विसावे, सिस्टर इनचार्ज चेतलानी, वैशाली चासकर, रवींद्र माने आदी उपस्थित होते.