पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:17 AM2018-08-08T03:17:02+5:302018-08-08T03:17:11+5:30

महाड आणि जवळच असलेल्या किल्ले रायगडमुळे महाड तालुक्याला विशेष महत्त्व आले आहे

Insufficient manpower in police station | पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ

पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : महाड आणि जवळच असलेल्या किल्ले रायगडमुळे महाड तालुक्याला विशेष महत्त्व आले आहे, यामुळे रायगड आणि महाडमध्ये पोलिसांना कायम सज्ज राहावे लागत असले, तरी या ठिकाणी असलेल्या महाड शहर, महाड तालुका आणि महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत कर्मचाºयांवर प्रचंड ताण येत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून अधिक पोलीस कर्मचारी देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमी असलेल्या महाड शहराला या दोन महामानवांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतिवर्षी लाखो भीमसैनिक आणि शिवभक्त, महाड तसेच किल्ले रायगडावर येत असतात. याचप्रमाणे विविध संघटनांचे महाड हे प्रेरणा स्थळ असल्याने या ठिकाणी त्यांचे विविध कार्यक्र म होत असतात. महाड हे जसे ऐतिहासिक स्थळ आहे, तसेच राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे ठिकाण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज यानिमित्ताने महाडमध्ये येत असतात.
महाड हे आंदोलकांचेही ठिकाण आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे महाड जगाच्या नकाशावर आले आहे. महाडमध्ये येणारा पूर, डोंगरदºयात येणाºया दरडी यामुळे महाड हादरून गेले आहे. प्रशासन यात महत्त्वाची भूमिका घेत असले तरी महाड मधील विविध शासकीय कार्यालयांत आज कर्मचाºयांचा तुटवडा आहे. असाच तुटवडा सध्या पोलीस ठाण्यांना देखील जाणवत आहे.
महाड पूर्वीपासून व्यापारी केंद्र राहिले आहे. शिवकाल आणि ब्रिटिश काळापासून महाड हे बंदर असलेले ठिकाण होते. आज काळाच्या ओघात बंदर नष्ट झाले असले तरी संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण महाड आहे. दळणवळण साधने वाढीस लागल्यानंतर महाड शहराचा विस्तार वाढत गेला. पूर्वीपेक्षा महाडची लोकसंख्या पाचपट वाढली आहे. महाड तालुक्याची लोकसंख्या आता एक लाख ८० हजार १९१ इतकी आहे. यामध्ये १८४ गावे आणि ३५० वाड्यांचा समावेश आहे. त्यामानाने महाडमध्ये असलेले प्रशासन कर्मचारी संख्या अपुरी आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यात ७५ इतकी पदे मंजूर असताना २५ पदे रिक्त आहेत. सध्या फक्त ५० कर्मचारी कार्यरत आहेत. महाड तालुका पोलीस ठाण्यातही सात पदे जागा रिक्त आहेत. सध्या २८ कर्मचारी काम करीत आहेत. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत ८९ गावे येतात. ही सर्व गावे दुर्गम भागात वसलेली आहेत. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत अति संवेदनशील गावे देखील आहेत, किल्ले रायगडही तालुका पोलीस ठाणे हद्दीत आहे.
४६ पैकी १५ जागा रिक्त
महाड औद्योगिक पोलीस वसाहतीतही हीच अवस्था आहे. ४६ कर्मचाºयांपैकी १५ जागा रिक्त आहेत. महाड औद्योगिक पोलीस ठाणे हद्दीतदेखील ५८ गावांचा समावेश आहे. या ठिकाणीदेखील काही ना काही घटना सातत्याने घडत असतात. मात्र, या तिन्ही पोलीस ठाण्याला असलेल्या कर्मचाºयांच्या तुटवड्यामुळे उर्वरित कर्मचाºयांवर कामाचा ताण येत असतो. अनेकदा या कर्मचाºयांना २४ तास ड्युटी करावी लागते.
>वरिष्ठ पातळीवरून कार्यवाहीची गरज
महाड तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि येथील भौगोलिक स्थिती पाहता महाड तालुक्याला अधिक किंवा मंजूर पदे पूर्ण भरणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत महाडमध्ये पोलीस पदे रिक्त आहेत. याबाबत स्थानिक पोलीस कार्यालयाकडून कायम मागणी होत असली तरी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होत नाही. याचा परिणाम स्थानिक नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. महाडमधील ग्रामीण भागातून पोलीस विभागाशी संबंधित दाखले मिळवण्याकरिता फेºया माराव्या लागतात. कार्यालयातील कर्मचारीही अनेकदा बंदोबस्ताकरिता तैनात केले जातात, यामुळे महाड तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्यात कर्मचारी आणि अधिकारी पदे भरली जाणे आवश्यक आहे.
गेली काही वर्षांत विशेष पथके तयार झाली आहेत, यामुळे रिक्त पदे वाटत असली तरी ती पदे रिक्त नाहीत. शिवाय, सध्या तेथील परिस्थिती पाहूनच बंदोबस्त तयार करण्यात आला आहे.
- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Insufficient manpower in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस