रोह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:01 AM2021-04-09T01:01:18+5:302021-04-09T01:01:28+5:30
२६ गाव पाणीपुरवठा योजना निकामी
रोहा : तालुक्यातील पश्चिम खोऱ्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या भागासाठी कार्यान्वित केलेल्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी या गावांना पोहोचत नाही. यामागची कारणे प्रशासन व लोकप्रतिनिधींना माहीत आहेत; मात्र त्यांच्याकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे गावांना टँकरद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तालुका प्रशासन या गावांना पाणीपुरवठा करण्यास सपशेल असफल ठरल्याचे चित्र
आहे.
पश्चिम खोऱ्यातील खारापटी ते धोंडखार २६ गाव पाणीपुरवठा योजना निकामी ठरत आहे. २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे २०१९ पर्यंत पाणी सुरळीत सुरू होते. मात्र काही गाव, रस्त्यालगतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ जोडणी केली.
प्रारंभीच्या गावांना मुबलक पाणी तर दूरच्या धोंडखार, यशवंतखार, सानेगाव, शेणवई, झोळांबे, लक्ष्मीनगर अशा अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. अनधिकृत जोडणीकडे संबंधित प्रशासन अधिकारी, स्थानिक पुढाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केल्याने दूरच्या गावांची स्थिती अधिक बिकट झाली.
आता निडी, खारापटी, धोंडखार, सानेगाव, यशवंतखार, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई, भातसई गावांच्या उंच भागात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे योजनेतील असंख्य गावांमध्ये आज पाण्याची भीषणता जाणवत आहे. तीन-चार गावे वगळता अन्य गावांत पाणीच पोहोचत नाही.
लक्ष्मीनगर झोलांबे वाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावरून उतरलेला पाण्याचा हंडा पुन्हा त्यांच्या डोक्यावर चढवला आहे. त्यासाठी लोकांना व जनावरांचे पाण्याविना हाल होत आहेत. येथे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
- रत्नदीप चावरेकर, लक्ष्मीनगर ग्रामस्थ