उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती उपयुक्त; खालापूर येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:41 PM2020-02-04T23:41:49+5:302020-02-04T23:42:03+5:30
शासनाने नुकतेच निर्गमित केलेल्या परिपत्रकाची माहिती देत प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शक केंद्राचा लाभ घ्यावा.
कर्जत : शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, गांडूळशेती, मत्स्यपालन, फलोत्पादन अशा पूरक व्यवसायाची जोड देऊन त्यातून मिळणारे दुय्यम घटक वाया न घालवता त्याचे चक्रीकरण करून उत्पादन व उत्पन्न वाढवणारी एकात्मिक शेती पद्धती अवलंबण्याची गरज आहे. त्यांनी शासनाने नुकतेच निर्गमित केलेल्या परिपत्रकाची माहिती देत प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शक केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांनी केले.
कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर येथील प्रगतशील नारायण बाळकृष्ण जगताप यांच्या शेतावर संपन्न झाली. या वेळी ते बोलत होते. डॉ. रवींद्र मदार्ने यांनी ‘ग्राम बीजोत्पादन’, ‘एक गाव, एक वाण’, ‘गट शेती’ व ‘यांत्रिकीकरणाचे महत्त्व’ शेतकऱ्यांना सोदाहरण पटवून देत विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज प्रतिपादित केली. डॉ. नामदेव म्हसकर यांनी कंद पिकाची माहिती देत
शेतकºयांनी समूह शेती करण्याची गरज प्रतिपादित केली. डॉ. हेमंत पवार यांनी विविध फळपिके, भाजीपाला पिके यावरील रोग तसेच अमरवेल व वाळवी निर्मूलन उपाययोजनांची माहिती देत शेतकºयांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ व शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे समन्वयक डॉ. रवींज्र मदार्ने, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष गजानन दळवी, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. नामदेव म्हसकर, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. हेमंत पवार प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी शेतकºयांनी विमा कंपनी, खासगी बँका तसेच शेतीशी निगडित विविध प्रश्न उपस्थित केल्यावर शास्त्रज्ञांनी त्यांना समर्पक उत्तरे देत त्यांचे समाधान केले. या वेळी कृषी अधिकारी सी. एस. खाडे व विस्तार कृषी अधिकारी एस. एस. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.