चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:58 AM2020-06-04T05:58:32+5:302020-06-04T05:58:46+5:30
समुद्रात गेलेले ३० मच्छीमार सुखरूप वाचले; बंदी असतानाही गेले होते मासेमारीला
हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : संपूर्ण कोकण किनारपट्टीसह जिल्ह्यात लोकांच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, समुद्रात मासेमारीला बंदी असतानाही वसई येथील मासेमारीला गेलेल्या दोन बोटींतील सुमारे ३० मच्छीमार वादळात अडकून पडले होते. मात्र वादळाचा वेग मंदावल्याने ते वाचले.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी सकाळपासूनच सातपाटीसह उच्छेळी-दांडी, मुरबे, नवापूर, केळवे आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने गावागावात चोख बंदोबस्त ठेवला होता.
किनारपट्टीवरील वसई ते झाई या ११० किलोमीटर अंतरावरील गावांची एनडीआरएफ पथकाने पाहणी करीत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक भाग असलेल्या डहाणू, बोर्डी, सातपाटी आदी गावांतील किनाºयावर तळ ठोकला होता.
वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील समुद्रात मासेमारीला गेलेल्या दयावान आणि प्रेमळ या दोन मच्छीमार बोटी समुद्रातील वादळी वाºयामुळे अडकून पडल्या होत्या. समुद्रात १९/३१ आणि ७२.२९ अक्षांश, रेखांश आणि साधारणपणे २० नॉटिकल समुद्री क्षेत्रात या दोन्ही बोटींतील ३० मच्छीमार अडकून पडले होते. जिल्हाधिकारी शिंदे यांनी कोस्टगार्डशी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.
सातपाटीमधील मच्छीमार सनी चौधरी यांनी त्या बोटींच्या वायरलेस सेटवर संपर्क साधून त्यांना सातपाटी बंदरात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतकार्य पोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असतानाच समुद्रातील वाºयाचा वेग कमी झाल्याने या दोन्ही बोटी वसईमध्ये उशिराने पोहोचल्या. १ जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असताना या बोटी समुद्र्रात मासेमारीसाठी राहिल्याने सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघरकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.