अलिबाग : चार जिल्ह्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना मध्यप्रदेशातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. तब्बल ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.आरोपींनी रायगड, रत्नागिरी, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये १५ घरफोड्या आणि सहा चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.सुनील लालसिंग मुझालदा (२३, रा. घोर, जि.धार), रवी उर्फ छोटू मोहन डावर (१८, रा. जवार, जि. इंदोर), कपिल गजेंद्र पांचोली उर्फ जैन (१८ रा. बोरी, जि.अलीराजपूर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण भागात चोरी, घरफोडी या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हेगाराची गुन्हे करण्याची कार्यपद्धती, गुन्हे करण्याचे ठिकाण, दिवस, वेळ याचा आढावा घेऊन तपास सुरू केला. या आढाव्यामधून एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे दगड. चोरी वा घरफोडी केल्यानंतर ही टोळी त्याठिकाणी दगड म्हणून छाप ठेवत होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही या टोळीपर्यंत पोचण्यात यश आल्याचे पारसकर यांनी सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली अमोल हंबीर, प्रतीक सावंत, सुनील खराडे, हनुमान सूर्यवंशी यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धार, इंदोर, अलीराजपूर अशा विविध जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे पथकाने मध्यप्रदेश येथून सुनील लालसिंग मुझालदा, रवी उर्फ छोटू मोहन डावर, कपिल गजेंद्र पांचोली उर्फजैन या तिघांना अटक केली.तिन्ही आरोपींची चौकशी केली असता रायगडसह रत्नागिरी, पुणे, या जिल्ह्यामध्ये १५ घरफोडी आणि सहा चोरीच्या अशा एकूण २१ गुन्ह्यांची कबुली दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तीन आरोपींकडून १० लाख २३ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे सोने, एक लाख रुपये किमतीची ३०० ग्रॅम चांदी यासह चार मोटारसायकल असा एकूण ११ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांना पोलीस कोठडीत ठेवले आहे.>गुन्ह्याच्या ठिकाणी ठेवायचे ‘दगड’ निशाणीघरफोडीतील गुन्हेगार हे मध्यप्रदेशातील इंदोरमार्गे बसने धुळे, मार्गे अहमदनगर नंतर पुणे जिल्ह्यात यायचे. तेथून ते घाट रस्त्याने कोकणात येत होते. दिवसा नदीकिनारी वास्तव्य करून रात्री टोळीने घरफोड्या करायचे. त्यानंतर चोरीचा ऐवज घेऊन त्याच गावातील मोटारसायकल चोरून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करायचे.या टोळीतील सदस्य गुन्हा करताना दगड आणि कुºहाडीसारख्या हत्यारांचा वापर करायचे. घरफोडी, चोरी केल्यानंतर त्याठिकाणी दगड ठेवून ते पसार होत होते. २०१७ मध्ये या टोळीने पेण शहरामध्ये घरफोडी केली होती, परंतु त्याचा शोध लागला नव्हता.
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:52 PM