मुरुड : शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला एका महिन्याच्या आत सुरुवात होणार आहे. मुरुड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अतिक खतीब निवासस्थान ते दस्तुरी नाका व आझाद चौक ते मासळी मार्केट या दोन रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामांना नगरसेवकांची मंजुरी मिळाली असून, सुमारे ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ७० लाख रुपये ही रस्ते अनुदानातून रक्कम प्राप्त झाली असून सध्या या दोन रस्त्यांची तांत्रिक मान्यता घेण्यासाठी एमजीपीकडे प्रकरण पाठवले आहे. तांत्रिक मान्यता मिळताच तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मुरुड शहरातील अंतर्गत रस्ते खूप खराब झाल्याने शहरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्याधिकारी अमित पंडित यांनी त्यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. मुख्याधिकारी अमित पंडित यांनी मुरुड शहरातील हे रस्ते बीबीएम तद्नंतर त्यावर कार्पेट मारण्यात येणार आहे. त्यामुळे हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या हे दोन रस्ते सर्वप्रथम तयार करण्यात येणार आहेत. तद्नंतर शहरातील चार रस्तेसुद्धा तयार करण्यात येणार आहेत; परंतु या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. ज्या वेळी निधी प्राप्त होईल, तेव्हा हे रस्तेसुद्धा बनवणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मुरुड नगरपरिषदेचा स्वच्छता स्पर्धेत क्रमांक आल्याने अडीच कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. ही रक्कम शासनाच्या अध्यदेशाप्रमाणे खर्च करावयाची आहे. यासाठी आम्ही कृती आराखडा बनवला आहे, त्याप्रमाणे सदरची रक्कम खर्ची पडणार आहे.
स्वच्छतेसाठी ६२ लाख खर्च
मुरुड नगरपरिषदेचे प्रत्येक वर्षाला स्वच्छता करण्यासाठी ६२ लाख रुपये खर्च होतात. मुरुड शहरातील कचरा गोळा करून तो कचरा तेलवडे येथील डम्पिंग ग्राउंडवर पोहोचवण्याचे काम गंगोत्री इको यांना देण्यात आले आहे. सध्या मुरुड शहरात प्लास्टिकमुक्त अभियान सुरू आहे. यासाठी नगरपरिषदेने प्लास्टिक संकलन केंद्रसुद्धा सुरू केले आहे. सध्या मुरुड शहरात एक हजार कापडी पिशव्या वाटप करण्यात आलेल्या आहेत; परंतु आणखीन पाच हजार कापडी पिशव्या वाटणार असल्याचे या वेळी मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुरुड शहरातून येणाºया पर्यटकांकडून ठरावीक रक्कम आकारण्यात येते. हा स्वच्छता कर वर्षाला १२ लाख रुपये इतक्या बोलीवर दिला जातो; परंतु यंदा हा ठेका कोणीही न घेतल्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी वसुलीचे काम करीत असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.