रायगड जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये, संस्था, पोलीस ठाणे आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने योगसाधनेचे महत्त्व योगशिक्षकांनी, डॉक्टरांनी सांगितले. ठिकठिकाणी योगासनाची प्रात्यक्षिके दाखवून आसने करून घेण्यात आली.अलिबाग : निरोगी जीवनासाठी योग उपयुक्त असल्याने ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यास मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन जिल्ह्यात योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेऊन साजरा करण्यात आला.जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा पोलीस विभाग आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यक्र म पोलीस परेड मैदान अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. सुमारे एक तास चाललेल्या योग प्रात्याक्षिक कार्यक्रमात पतंजली योगचे दिलीप गाटे यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिके दाखविली. योगाचा शारीरिक, मानसिक लाभ कसा होतो याचे मार्गदर्शन केले. त्यांना रवि पंडित, उषा बाबर, वैशाली पवार यांनी सहकार्य केले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षकअनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच विविध सरकारी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त प्रीझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सुचितासाळवी, स्पर्धा विश्व अॅकॅडमीचे विद्यार्थी, अलिबाग येथील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आदीनी या योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.‘आजारावर रामबाण उपाय म्हणजे योग’आगरदांडा : आजच्या वातावरणामुळे आणि खाण्या-पिण्याच्या सवयी बिघडल्यामुळे मानवाला विविध शारीरिक व्याधींची लागण होत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थुलता वाढणे, हृदयविकार या आजाराचे प्रकार मानवी जीवनात प्रमाणाबाहेर वाढत आहेत. या सर्व गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे योगसाधना अंगीकार करणे होय. कारण त्यातून मानवाचा शारीरिक विकास होऊन रोगप्रतिबंधक शक्तीची वृद्धी होते, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी के ले.मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात भारतीय तटरक्षक व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिननिमित्त वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून योगदिन साजरा करण्यात आला. डॉ. सुभाष म्हात्रे म्हणाले की, योगसाधनेमुळे मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होऊन शारीरिक-मानसिकदृष्ट्या तो सक्षम होऊन त्याच्यात एकाग्रता व आत्मविश्वासाची निर्मिती होते.योगा प्रशिक्षक प्रमोद मसाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योगामुळे वजनात घट, सशक्त व लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, तणावापासून मुक्तता, रोगप्रतिकार शक्तीत वाढ, असे फायदे या योगातून मिळत असतात. तरी के वळयाच दिवशी योग न करता रोज योगा करावा, असे सांगितले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य रंगुनवाला, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, असिस्टंट कंमाडर कृष्ण कुमार, योग प्रशिक्षक प्रमोद मसाल, डॉ. मुरलीधर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.जनता विद्यालयात योगासनेरसायनी : योग आणि शून्याचा शोध या भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या मोठ्या देणग्या आहेत. योगामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते. मनाच्या एकाग्रतेसाठीही योग आवश्यक आहे. २१ जून रोजी पाचव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मोहोपाडा(ता. खालापूर) येथील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांची योगासने घेण्यात आली.ताडासन, वृृृक्षासन, वज्रासन, त्रिकोणासन आदी योगासने शिक्षक देवाजी काळे यांनी करवून घेतली व योगाचे महत्त्व सांगितले. या वेळी मुख्याध्यापक डी.सी.सुपेकर, पर्यवेक्षक एस.एस.पवार, शिक्षक दत्ता वाघ, देवाजी काळे, बाबासाहेब फुंदे, चिंतामण ठाकरे, योगेश चिले आदी उपस्थित होते.२५०० ते ३००० विद्यार्थ्यांनी के ली योगासनेमुरुड : आंतरराष्ट्रीय योगदिन सर एस ए हायस्कूलच्या क्रीडांगणावर मुरुड तहसील कार्यालय, पंचायत समिती, मुरुड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.यावेळी मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, पोलीस प्रतिनिधी बूथकर, उपमुख्याध्यापक दिनकर पाटील, पर्यवेक्षक रमेश मोरे आदीउपस्थित होते. सुमारे २५०० ते ३००० विद्यार्थी या योगासन कार्यक्रमात सहभागी झाले होते. योगशिक्षक पी. के. आरेकर, प्रमोद मसाला यांनी प्रथम प्रार्थना घेऊन कपालभाती, अनुलोम विलोम हे प्राणायाम घेऊन बौद्धिक व शारीरिक विकासात्मक योगासने प्रकार घेतले.रसायनीत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली योगासनेमोहोपाडा : एकविसाव्या शतकातील इंटरनेट मोबाइलच्या जमान्यात मानवी जीवन अतिशय गतिशील झाले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक व मानसिक ताण-तणावाची मोठ्या प्रमाणात वृद्धी होत आहे. योगसाधनेतून मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होऊन शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो सक्षम होऊन त्यांच्यात एकाग्रता व आत्मविश्वासाची निर्मिती होते. याकरिता जागतिक योगदिनाच्या निमित्ताने रसायनी पोलीसठाण्याच्या सभामंडपात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्यासह सर्व रसायनी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता योगसाधना करून दैनंदिन जीवनात योगाला महत्त्व असल्याचे दाखवून दिले.शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा असून प्रत्येक नागरिकाने रोजच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून नित्य योगसाधना करावी, असे आवाहन रसायनी पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी केले.म्हसळा येथील नाईक महाविद्यालयात योगदिन साजराम्हसळा : येथील बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्रमंडळ संचालित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग एन.एस.एस. विभाग, डी.एल. ई. विभाग व जिमखाना विभागातर्फे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.विभागप्रमुख डॉ. संजय बेंद्रे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणली जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात असे मत मांडले. या वेळी प्रा.के.एस. भोसले, डॉ. संजय बेंद्रे आदी उपस्थित होते.गगनगिरी आश्रमात सूर्यनमस्कारखोपोली : आंतरराष्ट्रीय योगदिवस खोपोलीत विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील लोहणा समाज सभागृहात हास्य क्लबच्या १५० हून अधिक सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारची योगासने सादर केली. संस्थेच्या अध्यक्षा जयमाला पाटील, माजी अध्यक्ष बाबूभाई ओसवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गगनगिरी आश्रमातही योगदिवस साजरा करण्यात आला. १०० हून अधिक लोकांनी सूर्यनमस्कार व योगासने केली.
रायगडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:13 AM