उरण परिसरातील इंटरनेट सेवा कोलमडली, तहसील कार्यालयात कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 05:54 AM2017-08-31T05:54:40+5:302017-08-31T05:54:46+5:30
मंगळवारपासून उरण परिसरातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा पुरती कोलमडली आहे. इंटरनेट बंदचा फटका येथील शेकडो ग्राहकांबरोबरच उरण तहसील कार्यालयालाही बसला आहे.
उरण : मंगळवारपासून उरण परिसरातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा पुरती कोलमडली आहे. इंटरनेट बंदचा फटका येथील शेकडो ग्राहकांबरोबरच उरण तहसील कार्यालयालाही बसला आहे. यामुळे शासकीय कामे ठप्प झाली आहेत.
उरण परिसरातील इंटरनेट सेवा मंगळवारपासूनच ठप्प झाली आहे. केबल ब्रेक झाल्याने इंटरनेटसेवा कोलमडली असल्याची माहिती उरण एमटीएनएल कार्यालयातून देण्यात आली. मात्र, इंटरनेट सेवा कोलमडल्याने येथील सुमारे दीड हजार ग्राहकांना याचा फटका बसला आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने ग्राहकांसोबत हजारो इंटरनेटधारक व्यापाºयांची चांगलीच कोंडी झाली आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा सर्वाधिक फटका येथील तहसील व इतर शासकीय कार्यालयांना बसला आहे. माहिती आदान-प्रदान करण्याच्या कामात बाधा आली आहे. अशीच स्थिती उरणमधील इतर शासकीय कार्यालयांची झाली आहे.
दोन दिवस एमटीएनएलची इंटरनेट सेवा बंद पडल्याने कामकाजावर परिणाम झाल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी इंटरनेट सेवा पूर्ववत होईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही संध्याकाळपर्यंत तरी इंटरनेट सेवा पूर्ववत झाली नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.