मुलाखती, पैसेही घेतले; पण चार वर्षे झाले नोकरीच नाही, हजारो स्थानिक तरुणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:13 PM2023-08-29T12:13:00+5:302023-08-29T12:13:12+5:30
रायगड सुरक्षा मंडळाकडून हजारो स्थानिक तरुणांची फसवणूक
अलिबाग : नोकरीचे आमिष दाखवून अलिबाग, पेण तालुक्यातील हजारो तरुणांकडून पैसे घेत, रायगड सुरक्षा मंडळाचे अधिकारी मारुती पवार, मनोज ठमके यांनी फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. मुलाखती आणि पैसे देऊन चार वर्षे होऊन गेली, तरी या तरुणांना नोकरी मिळत नसल्याने, हे तरुण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. फसवणूक झालेल्या या सर्व बेरोजगार तरुणांना हमखास न्याय मिळेल, अशी ग्वाही राजा केणी यांनी दिली आहे.
प्रत्येकी ४० हजार उकळले
रायगड सुरक्षारक्षक मंडळ हे नीम शासकीय मंडळ असून, त्यांच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांच्या नेमणुका केल्या जातात.
विविध कंपन्या, कार्यालयात सुरक्षारक्षकाची नोकरी मिळेल, असे आमिष दाखवत, प्रत्येकाकडून ४० हजार रुपयांपर्यंत पैसे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उकळले. या घटनेस चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला, तरीही रायगड सुरक्षा मंडळाने जिल्ह्यातील १ हजार २०० तरुणांना नोकऱ्याच दिल्या नाहीत.
ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, यातील बहुतांश तरुण भीती आणि लाजेखातर पुढे येऊन तक्रार करण्यास धजावत नाहीत, अशा तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे. न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची. - राजा केणी, जिल्हाप्रमुख शिवसेना.
माझ्याकडून ४० हजार रुपये रोखीने घेण्यात आले, मनोज ठमके या व्यक्तीकडे हे पैसे दिले होते. त्यानंतर, मी अनेकदा त्यांच्याकडे विचारणा केली; परंतु नोकरीही नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत.
- प्रकाश मेंगाळ, बेरोजगार तरुण.
हमखास नोकरी लागेल, असे सांगून माझ्याकडे ८० हजार रुपये मागण्यात आले होते, त्यातील ४० हजार रुपये मी उसणवारी करून पोच केले; माझ्या प्रमाणेच अलिबाग, पेण तालुकातील अनेक तरुण आहेत.
- गजेंद्र म्हात्रे, बेरोजगार तरुण.