वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिकेच्या मालकीच्या आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे जेसीबी, पोकलेन, डम्पर, ट्रॅक्टर थेट धरणाच्या पात्रात उतरवून दररोज हजारो ब्रास मातीचा उपसा सुरू आहे. या चोरीमुळे शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात जात आहे.
आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा होतो. मे ते जून महिन्यात पाणी आटल्याने धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे परिसरातील माफियांकडून धरणातून माती चोरण्यात येते. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सद्यस्थितीत दिवसाला ५० पेक्षा जास्त डम्पर भरून माती चोरली जात आहे. या मातीचा उपयोग वीटभट्ट्यासाठी केला जातो. गतवर्षी देखील अशाप्रकारे अवैधरीत्या मातीचे उत्खनन करणाऱ्यावर तत्कालीन पालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल केले होते. देहरंग धरणाच्या पात्रात माती उत्खनन करताना संबंधितांना मशिनरीसह रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावेळी डम्पर व जेसीबीच्या मालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते.धरणावर पनवेल महापालिकेमार्फत सुरक्षारक्षक देखील तैनात असताना, त्यांच्या उपस्थितीत दिवसाढवळ्या मातीचोरीचे प्रकार सुरू आहेत. पनवेल तालुक्यात अशाच प्रकारे डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. प्रशासनाकडून कारवाईचा अंकुश नसल्याने मातीचोरांचे फावत असल्याचे परिसरात नागरिकांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने देहरंग धरणातील माती उत्खनन करण्यासंदर्भात कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सुरू असलेले उत्खनन अवैध आहे. या संदर्भात सर्कल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्यात येईल आणि त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- एन. टी. आदमाने,नायब तहसीलदार,पनवेलदेहरंग धरणातील गाळ अथवा माती काढताना शासनाच्या महसूल विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. शासनाच्या सिंचन विभागाच्या अखत्यारीत हे धरण येते. मात्र दरवर्षी धरणाने तळ गाठल्यावर मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खननाला सुरुवात होत असते.