मुरुड : शहरातील गणेशआळी भागात राहणारे अजित जोशी यांच्या निवासस्थानी ३० नोव्हेंबर, २०१८ रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान सात लोक जखमी झाले होते; परंतु या स्फोटात गॅस सिलिंडर पूर्वी होता तसाच सापडल्याने स्थानिक नागरिकांनी शंका व्यक्त के ली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. हे निवेदन नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी स्वीकारले.
ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी मोठा स्फोट होऊन तीन किलोमीटरच्या परिसरात हादरा बसला होता. सर्व शासकीय यंत्रणेमार्फत ज्या वेळी आम्ही चौकशी केली, त्या वेळी गॅस सिलिंडरचा स्फोट असे उत्तर देण्यात आले. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अहवालात तपासणीमध्ये सिलिंडर फुटल्याची नोंद नाही. घटनेच्या वेळी सिलिंडर व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असेल, तर ज्यांनी ज्यांनी तपासणी केली त्या अहवालात गॅस टाकीचे तुकडे सापडले असा उल्लेख नाही, अशी शंका या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तरी अजित जोशी यांच्या घरातील स्फोटामुळे घबराटीचे वातावरण असून तातडीने याची बारकाईने चौकशी व्हावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
या वेळी निवेदन नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी स्वीकारले असून, त्यांनी या शिष्टमंडळास तहसीलदार काही कामानिमित्ताने बाहेर असून ते रुजू होताच पोलीस निरीक्षक यांच्या समवेत तहसील कार्यालयाच्या दालनात एका मिटिंगचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या वेळी संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाश वीरकुड, राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जाहिद फकजी आदी उपस्थित होते.