रायगड - जिल्हा एकीकडे कोरोनाच्या संकटातून मार्ग काढीत असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडला. या वेदनांमधून सावरत नाही तोच महाड शहरानजीक पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.महाड शहरानजीकच्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली .या घटनेनंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून घटनेबाबतची माहिती घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तातडीने मदत करण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.महाड शहरानजीक असणाऱ्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील कोसळलेल्या इमारतींबाबत माहिती घेताना या इमारतीला परवानगी देण्यात आली होती का ? अधिकृत आणि नियमांच्या अधीन राहून या इमारतीचे बांधकाम केले होते का ? महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी . इमारत दुर्घटनेबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि या इमारत दुर्घटनेमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे
महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, रवींद्र चव्हाण यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 9:44 PM