लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यामागे लागलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या हॉटेलचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी अलिबाग लाचलुचपत विभागात करण्यात आली. सुमारे चार तास ही चौकशी झाली.
माझी आणि कुटुंबाची चौकशी करूनही विभागाचे समाधान झाले नाही. आता माझ्याशी संबंधित बाहेरील व्यक्तींचीही चौकशी सुरू केली आहे. चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करत असून, यातून काहीच हाती लागणार नाही, असा विश्वास आमदार साळवी यांनी व्यक्त केला आहे. साळवी आणि त्याच्या कुटुंबीयांची गेल्या आठ महिन्यांपासून मालमत्तेसंबंधी चौकशी सुरू आहे.
महिन्याभरापूर्वी साळवी कुटुंबाची दोन दिवस चौकशी झाली होती. आमदार साळवी यांचे रत्नागिरी येथे चार भागीदारांमध्ये हॉटेल आहे. हे हॉटेल बांधण्यास पैसे कुठून आले, बांधकाम कुणी केले, साहित्य कुणी दिले, याबाबत १३ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. साळवी यांच्यासोबत चार जण चौकशीला हजर होते.