अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मागे लागलेला लाचलुचपत विभागाचा सासेमिरा सुटलेला नाही. शुक्रवारी ९ जून रोजी पुन्हा आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या हॉटेल बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी अलिबाग लाचलुचपत विभागात करण्यात आली आहे. माझी आणि कुटुंबाची चौकशी करूनही विभागाचे समाधान झाले नसून आता माझ्याशी सबंधित बाहेरील व्यक्तीची ही चौकशी सुरू केली आहे. मात्र चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करीत असून यातून काहीच हाती लागणार नाही असा विश्वास आमदार साळवीनी व्यक्त केला आहे.
आमदार राजन साळवी याची आणि त्याच्या कुटुंबाची गेली आठ महिन्यापासून मालमत्तेसबंधी अलिबाग लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. महिन्याभरापूर्वी साळवी कुटुंबाची दोन दिवस चौकशी झाली होती. यावेळी आमदार साळवी यांनी विभागाचे समाधान झाले असेल असे बोलले होते. मात्र साळवी यांच्या मागील लागलेले चौकशीचे शुल्ककाष्ठ अद्याप संपलेले नाही आहे.
आमदार साळवी याचे रत्नागिरी येथे चार भागीदारमध्ये हॉटेल आहे. या हॉटेल बांधण्यास कुठून पैसे आले, बांधकाम कुणी केले, साहित्य कुणी दिले अशा १३ जणांना लाच लुचपत विभागाकडून नोटीस पाठवली होती. त्यानुसार गुरुवारी यातील चार जण चौकशीला येऊन गेले होते. तर शुक्रवारी आमदार साळवी यांच्या सोबत चार जण चौकशीला हजर झाले आहेत. आमदार साळवी हे सुध्दा चौकशीला हजर आहेत.