पनवेल : पावसाळ्यात विक्रमी पाऊस पडून देखील खारघर सारख्या शहरातील रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. मागील दोन वषार्पासून ही समस्या भेडसावत आहे. वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने शेकापने बुधवारी खारघर सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत सिडको प्रशासनाचा निषेध केला.
निवडणुकीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत करण्यात आला होता. मात्र निकाल जाहीर होताच शहरात पुन्हा एकदा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खारघर शहराला ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना शहरवासीयांची तहान केवळ ६० एमएलडी पाण्यावर भागवली जाते. शहरात सुमारे १५ एमएलडी पाण्याचा तुटवडा असल्याने येथील सेक्टर १२, ११, २१, ३६ दहा आदी परिसरात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे.अनेक वेळा तक्रारी करून देखील कार्यवाही न झाल्याने बुधवारी महिलांनी हंडा मोर्चा काढत सिडकोचा निषेध केला. नगरसेवक गुरुनाथ गायकर व नगरसेवक हरेश केणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात लेखी आश्वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांच्या मार्फत दिला जात नाही तो पर्यंत आंदोंलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत खारघर सेक्टर ४ मधील सिडकोच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी गजानन दलाल यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना याठिकाणी आमची मागणी ऐकण्यासाठी बोलवा अशी भूमिका हरेश केणी यांनी घेत भरउन्हात ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. त्यांनतर काही कालावधीतच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता पी. बी.काळे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनाकांनी काळे यांना खाली बसून चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार काळे यांनी जमिनीवर बसून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाच एमएलडी पाण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात लवकरच तोडगा निघून खारघरला अतिरिक्त पाच एमएलडी पाणी मिळणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
आंदोलनात नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्यासह सुदर्शन नाईक,संजय जाधव, रमेश मेनन आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.