इर्शाळवाडी दुर्घटना: देवेंद्र फडणवीस यांनी जीवित आणि वित्तहानीबाबत दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:05 AM2023-07-20T09:05:00+5:302023-07-20T09:05:08+5:30
Raigad Irshalwadi Landslide Incident: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून, या दुर्घटनेतील जीवित आणि वित्तहानीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसादरम्यान रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथे डोंगरकडा गावावर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या डोंगराचा मोठा भाग कोसळून त्या ढिगाऱ्याखाली सुमारे ४० ते ५० घरे गाडली गेल्याची माहिती समोर येत असून, त्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून, या दुर्घटनेतील जीवित आणि वित्तहानीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत.
प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.