अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आणखी ५ जणांचे मृतदेह शनिवारी हाती लागले. त्यांच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत एकूण २७ मृतदेह मिळाले असून, अद्याप ७८ जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जण जखमी झाले होते. यापैकी ४ जणांवर एमजीएम, ४ जणांवर खालापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १३ जणांना उपचारांनंतर सोडण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. डॉक्टर, रुग्णवाहिका, औषधांसह सर्व उपचारासाठी लागणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखालून काढलेल्या २७ मृतदेहांचे शवविच्छेदन डॉक्टरांच्या पथकाने केले आहे.
दरड दुर्घटना घडल्यानंतर तातडीने प्रशासन यंत्रणा, स्थानिक पथके घटनास्थळी दाखल झाली. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेनेही त्वरित धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी एक दिवस आधीच आपला पदभार हाती घेतला होता.
नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यावर यात जखमींवर त्वरित उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. इर्शाळवाडी येथील दुर्घटना घडल्यावर आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका असे अनेक जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. गेल्या तीन दिवसांत २७ मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. मातीने माखलेले मृतदेह, त्यांचे शवविच्छेदन करण्याचे काम चार पथकांच्या साहाय्याने करण्यात आले. शवविच्छेदनानंतर घटनास्थळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
दरड दुर्घटनेत वाचलेले ७६ जण आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. घडलेल्या प्रसंगातून ते अजून सावरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात त्यांच्या मनावर आघात होऊ शकतो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांमार्फत त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत. - डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक