दिवेआगर पर्यटनस्थळ आहे की डम्पिंग ग्राऊंड?, रस्त्यांसह नदी, नाले कचऱ्यामुळे भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:22 PM2024-01-19T13:22:32+5:302024-01-19T13:22:53+5:30
दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे.
- गणेश प्रभाळे
दिघी : देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटनस्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे दिवेआगर पर्यटनस्थळाचे आता विद्रुपीकरण होत आहे.
दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. येथील स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे इथल्या पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
यासाठी रोजगाराच्या दृष्टीने सर्वत्र हॉटेल्स व होमस्टे व्यवसायांचे जाळे पसरले आहे. मात्र, यातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासुर येथील रस्ता, नदी, नाल्यात पाहायला मिळत आहे.
प्लास्टिकचा खच
दिवेआगरचा समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहावा, सदैव पर्यटकांनी गजबजून जावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, पर्यटनस्थळाला जोडणारे बोर्लीपंचतन, भरडखोल व वाकडा पूल असे तीन मार्ग असून, या मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या असंख्य बाटल्यांचा खच पडला आहे.
याच रस्त्यांच्या तिन्ही बाजूंना यशवंती खार परिसरात स्थानिकांच्या नियमित पीक घेणाऱ्या शेतजमिनी आहेत. मात्र, पर्यटकांना नेहमीच साद घालणाऱ्या या खाड्या, प्लास्टिक व कचरा, गाळाने भरल्या आहेत.
दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिल पाहिजे. अशाप्रकारे जर दुर्गंधी पसरली जात असेल तर पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कचरा टाकताना सापडल्यावर दंडात्मक कार्यवाही आतापर्यंत केली आहे; परंतु यापुढे जर कचरा टाकताना कोणी सापडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.
- सिद्धेश कोजबे, सरपंच, दिवेआगर