पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक असलेले पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानाला सेवा क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे ९०१-२०१५ आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मानांकनामुळे बल्लाळेश्वर देवस्थानची गणेशभक्तांच्या सेवेप्रति असणाऱ्या कार्याची पावती मिळाल्याचा आनंद देवस्थानच्या कार्यकारिणीसह गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.मुंबई येथील क्वालिटी रिसर्च आॅर्गनायजेश अॅक्रिडटेशन बोर्डचे लक्ष्मीकांत साधू यांच्या हस्ते श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व सर्व विश्वस्तांना ९०१-२०१५ आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण करून गौरविण्यात आले. अष्टविनायकांपैकी आयएसओ मानांकन मिळविणारे पाली तिसरे देवस्थान आहे. पाली बल्लाळेश्वर देवस्थानातील कार्यालयात प्रमाणपत्र वितरण व प्रसाद लाडू योजनेचा शुभारंभ पार पडला. पाली बल्लाळेश्वर देवस्थान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आध्यात्मिक केंद्र बनेल, असा विश्वास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धारप यांनी व्यक्त केला.लक्ष्मीकांत साधू म्हणाले, बल्लाळेश्वर देवस्थानचे नियोजनबद्ध कार्यक्र म, कार्यालयीन दस्तावेज, याबरोबरच सुसज्ज व्यवस्थापन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवासाची उत्तम व दर्जेदार सुविधा, भोजन व प्रसादाची व्यवस्था, मंदिर परिसरातील स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे, भाविक भक्तगणांना पुरवल्या जाणाºया आवश्यक सेवा व सोई-सुविधा, भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी केलेली रेलिंग व्यवस्था आदी बाबीतून देवस्थानचे सुव्यवस्थापन दिसून येत असल्याचे साधू यांनी सांगितले.प्रास्ताविकात जितेंद्र गद्रे यांनी, बल्लाळेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील पहिल्या तीन देवस्थानांपैकी एक असेल, असा संकल्प केला आहे. देवस्थानामार्फत मंगळवारी आठ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. भाविक व नागरिकांना भोजनाव्यतिरिक्त प्रसाद लाडू योजनेद्वारे प्रसाद दिला जाणार आहे, तसेच देवस्थानतर्फे यज्ञशाळेचे निर्माण करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना सामूहिक याग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अन्नछत्राच्या टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस निर्मिती आणि देवस्थानच्या पाणी पंपासाठी लागणारी वीज म्हणून सोलर एनर्जीचा उपक्र म देवस्थानने सुरू केला असल्याचे गद्रे यांनी सांगितले.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:37 AM