महाड : महाड तालुक्यातील मुठवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. अशा प्रकारचे आयएसओ मानांकन मिळवणारी मुठवली ग्रामीण भागातील शाळा पहिली ठरली आहे.शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या मुठवली शाळेत सध्या ५२ विद्यार्थी शिक्षण घेत असून, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या या गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी व शाळेच्या शिक्षकवर्गाने घेतलेल्या परिश्रमामुळे मुठवली शाळेला हा बहुमान मिळाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा शहरातील खासगी शाळांच्या बरोबरीने राहावा व ग्रामिण भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावेत, यासाठी सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून या शाळेने आपली प्रगती साधली आहे.सुसज्ज इमारत, आनंददायी परिसर, बोलके व्हरांडे, विज्ञान प्रयोगशाळा, मुबलक अध्यापन साहित्य, संगणक शिक्षण ई-लर्निंग व डिजिटल रूम, क्रीडा साहित्य आदी सुविधा या शाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तालुक्यातील २६ शाळांची आयएसओ मिशनसाठी निवड करण्यात आलेली होती. मागील आठवड्यात यशगुरू टेक्नॉलॉजी वाई येथून सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखालील द्विस्तरीय समितीने परीक्षण व आॅडिट करून मुठवली शाळेची आयएसओ २००८ मानांकनासाठी निवड केली.
मुठवलीच्या शाळेला आयएसओ मानांकन
By admin | Published: April 10, 2016 1:13 AM