गोवा महामार्गावरील दुभाजक बंद करण्याचा वाद चिघळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:11 AM2019-07-18T00:11:12+5:302019-07-18T00:11:18+5:30
गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे.
पाली : गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र याचवेळी महामार्गावरील अनेक गावांसाठी उपयुक्त असे यूटर्न बंद करण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांना साकडे घातले असून न्याय मिळवून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगावसह पायरवाडी, कातळावाडी, भपकेवाडी, एकलघर या आदिवासी वाड्यांसह नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी ही सर्व गावे व आदिवासी वाड्यांमधील लोकसंख्या सुमारे ३ हजार ५०० आहे. या सर्वांना बाजारपेठचे जवळचे मुख्य ठिकाण असलेल्या नागोठण्यात महामार्गावरूनच यावे लागते. त्यामुळे या गावांतून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक व यूटर्न बंद झाल्यास या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आदींना नागोठण्यात येण्या- जाण्यासाठी दूरवर ठेवण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा एकमेव पर्याय आहे. गावांकडे जाणाºया महामार्गालगतच्या जोड रस्त्याजवळ यूटर्न ठेवण्याची मागणी कोंडगावचे तत्कालीन सरपंच कृष्णा धामणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे एका निवेदनाद्वारे डिसेंबर २०१२ केली होती. कोंडगावमधील शेकापचे युवा कार्यकर्ते नितीन राजीवले यांनी या विषयाचा पाठपुरावाही केला होता. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखलही घेतली नाही.
सद्यस्थितीत महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने महामार्ग एकेरी झाल्यास ग्रामस्थांना नागोठण्यात जाण्या-येण्यासाठी दूर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच शेतीचे व इतर कामासाठी साहित्य ने-आण करताना बैलगाडीचा वापर करणेही शक्य होणार नाही. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे व त्याचा अधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना होणार आहे. पनवेल येथील महामार्गाच्या कार्यालयात तीन ते चार वेळा जाऊन पाठपुरावा देखील केला आहे, परंतु यावेळी आम्हाला संबंधितांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप सरपंच अनंत वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या ग्रामस्थांना नागोठण्यात येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनानेही पूल टाकून खालून रस्ता ठेवलेला आहे. त्यामुळे भविष्यातील त्रास टाळण्याकरिता आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खा. तटकरेंकडे ग्रामस्थांनी केली आहे.