भाडेकरूंना गाळे खाली करण्याची नोटीस
By admin | Published: April 9, 2016 02:20 AM2016-04-09T02:20:56+5:302016-04-09T02:20:56+5:30
तळा ग्रामपंचायत असताना विकासाचे दृष्टीने उत्पन्न फार कमी होते. तत्कालीन सरपंच बाळशेट दलाल यांचे कारकीर्दीमध्ये २० वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर पाच वर्षांच्या कराराने दिले
तळे : तळा ग्रामपंचायत असताना विकासाचे दृष्टीने उत्पन्न फार कमी होते. तत्कालीन सरपंच बाळशेट दलाल यांचे कारकीर्दीमध्ये २० वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर पाच वर्षांच्या कराराने दिले. मुदत संपल्यानंतर तोच करार पुन्हा नवीन करून १० ते २० टक्के भाडेवाढ करून त्याच दुकानदारांना तो दुकानगाळा दिला जात असे. मात्र जानेवारी २०१६ मध्ये तळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आणि तळा नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आली. ३१ मार्च २०१६ला या दुकान गाळेधारकांच्या भाडेतत्त्वाच्या मुदती संपल्याने साधारणपणे १० मार्चला तळा नगरपंचायत प्रशासनाने दुकान गाळे भाडेधारकांना मुदत संपल्यामुळे गाळे खाली करण्यासंदर्भात नोटिसी दिल्या आहेत. या नोटिसी मिळाल्यानंतर सर्व दुकानदारांना पुढे काय, हा प्रश्न पडला आहे.
भुुई भाडेकरू साधारणपणे ३५ असून, त्यांच्यापासून नगरपंचायतीला १ लाख ८० हजार रुपयाचे उत्पन्न मिळते तर दुकानगाळे भाडेकरू अंदाजे ४० असून त्यांच्यापासून वार्षिक उत्पन्न साधारणपणे ३ लाख मिळते. यांचा उदरनिर्वाह ही याच दुकानाच्या उत्पन्नावर चालतो, अशा परिस्थितीत नगरपंचायतीकडून दुकानगाळे खाली करण्याची नोटीस मिळालेने सर्वच भाडोत्री हवालदिल झाले आहेत. याबाबत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश माणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही सर्व दुकानदारांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा मुंढे व पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गुळवे यांना संघटनेतर्फे निवेदन देऊन दुकानगाळे पूर्वीच्याच भाडेकरूंना द्या. अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)