बिरवाडी : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच कोकणातील नेतृत्वाला न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांनी केले. तसेच महाड एमआयडीसीमधील एमएमएस सीईटीपी येथे २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कोविड योद्धा व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार वेळी करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच कोकणातील नेतृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आमदार बनू शकला. कोरोना महामारीमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच महाड एमआयडीसीमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेत अनेक रुग्णांचे प्राण वाजवले. कोरोना विषाणू महामारीच्या काळात मदतीचे वाटप करताना अनेक वेळा टीका-टिप्पणीचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या काळात आपल्या पायाला दुखापत झाल्याने काही काळ विश्रांती घ्यावी लागली. मात्र, संकटकाळामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्याची संधी आपल्याला लाभली असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.
या सत्कार समारंभामध्ये कोविड योद्ध्यांसह विविध क्षेत्रांतील १७५ मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व बुके देऊन करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिकेवरील चालक, नर्स, शासकीय अधिकारी- कर्मचारी, कंपनीचे व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता.