असाही साजरा होतो वाढदिवस, महाडच्या 'सुमित'ने जपलंय सामाजिक भान!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:43 PM2019-05-09T20:43:50+5:302019-05-09T20:45:32+5:30
आपला वाढदिवस कसा साजरा करावा याच्या अनेक कल्पना आपण रोज पाहतो.
- जयंत धुळप
अलिबाग - आपला वाढदिवस कसा साजरा करावा याच्या अनेक कल्पना आपण रोज पाहतो. स्वतचा चेहरा बॅनरवर गल्लीत झळकावून काही जण तर कहरच करतात. परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त एखाद्या आदीवासीवाडीवर जाऊन तेथील मुलांचे केस व्यवस्थित कापून देत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणे ही कल्पना म्हणजे निव्वळ परमार्थच. महाड शहरातील सुमित संजय पांडे याने यंदाही आपला वाढदिवस असाच साजरा केलाय. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुमीतने चालू ठेवला आहे. गेल्या दोन वर्षे मोहोप्रे येथे त्याने आपला वाढदिवस असाच साजरा केला होता.
आर्थिक परिस्थिती नसल्याने व वेळेअभावी आदिवासी मुलांचे पालक केस कापण्याच्या कृतीकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे त्वचेचे व केसांच्या आजाराला यांना सामोरे जावे लागते. पेशाने नाभिक असलेल्या सुमित संजय पांडे या तरूणाने आपल्या वाढदिवसानिमित्त आज नाते जवऴील कोळोसे आदीवासीवाडीवर जाऊन तेथील आदिवासी मुलांचे केस कापून दिले. आज कोळोसे वाडीवर सकाळीच केस कापण्यासाठी लाईन लागली होती.
सुमित पांडे हा तरूण येथील सर्व मुलांचे केस मोफत कापून देत होता. केस कापल्यावर मुलांना बिस्कीट व चाॅकलेट देऊन त्यांच्याशी गप्पाही मारत होता. सोबत त्याचे बंधू महेश मोरे देखील मुलांशी गप्पागोष्टी करत होते. आपल्या वडिलांचा हा सामाजिक सेवेचा वारसा सुमितने पुढे चालू ठेवला आहे. कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने संजय पांडे व महेश मोरे यांनी आदिवासी वाड्यांवर जाऊन मुलांचे केस कापून देण्याचा उपक्रम खूप वर्षापूर्वी सुरु ठेवला होता. सुमितने मात्र हा उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त करून सामाजिक भान जपले असल्याबद्दल त्याचे सर्वत्र कोतुक होत आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू आणि आपल्याला मिळालेलं पूर्ण समाधान यामुळे सुमितचे आयुष्य सुखासमाधानाने बहरेल हे मात्र नक्की.