श्रीवर्धन : आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक सुखाने व आनंदाने सलोख्याचे जीवन जगत आहेत. समाजातील सलोखा अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आह,े असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बाबर यांनी श्रीवर्धनमधील विविध प्रश्नांवर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
समाजातील प्रत्येक घटकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आपण वर्षभर अनेक सण, उत्सव व कार्यक्रम आयोजित करत असतो. प्रत्येकाचा हेतू व उद्देश चांगला असतो, त्यामुळे आपण सर्व एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतो, तेव्हा प्रत्येक कार्यक्रम शांततेने पार पडावा, असे बाबर यांनी सांगितले. श्रीवर्धनमधील वाहतूककोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, त्यानुसार पोलीस प्रशासन कार्यवाही करत आहे. जनतेने सहकार्य करावे, जेणेकरून वाहतूककोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शहर परिसरात उपद्रवी मोकाट जनावरांच्या मालकांना योग्य समज देऊन शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे बाबर यांनी सांगितले. या शांतता समितीच्या बैठकीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील विविध समाज समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, पत्रकार व पोलीस प्रशासनातील सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. पाटील, जे. जी. पेडवी व डी. एल. पाटील आदी उपस्थित होते.शांतता अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे- बापूराव पवारम्हसळा : मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण १० नोव्हेंबर रोजी, तर १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती हा सण येत असल्याने म्हसळा तालुक्यात सर्वधर्मीय शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांनी केले.श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैठकीला म्हसळा पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे आदी उपस्थित होते.