नागोठणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या पार्श्वभूमीवर नागोठणे विभागात मागील चार दिवसांपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतात तयार झालेली भातशेती भिजून गेली असल्याने, हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान झालेल्या भातशेतीचा तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला असल्याने आपल्या भातशेतीचा कधी पंचनामा होईल, याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.
नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते. ऑक्टोबर महिन्यात पीक तयार झाल्यावर भातशेतीची कापणी करून भाताच्या लोंबी चार-आठ दिवस शेतातच आडव्या करून ठेवल्यानंतर ते बाहेर काढून शेतातच त्याची झोडणी करून भात व पेंढा वेगवेगळा केला जातो. पंधरा दिवसांपासून भाताच्या कापणीला सुरुवात झाली असून, यातील दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रात भात शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे आपल्या घरीही नेऊन ठेवले आहे. मात्र, अजूनही अडीचशे ते तीनशे एकर जमिनीवरील काही भातशेतीची कापणी करून ते शेतातच पडून आहे, तर उर्वरित भाताचे पीक कापणी न झाल्याने शेतातच उभे आहे. संभाव्य वादळामुळे मागील चार दिवसांपासून येथे पाऊस पडत असल्यामुळे शेतात पावसाचे साचून राहिले असल्याने, हातात आलेले पीक भिजल्यामुळे हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेकडो टन भाताचे नुकसान होण्याची भीती आहे व जे भात उरेल, त्याचे दाणे काळे पडणार असल्याने त्याला किंमतही येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काढणीला आलेले पीक भिजले
रोहा : चालू वर्षात एका पाठोपाठ एक आलेली संकटे, त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याचे पाहणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. ‘नको देवराया अंत आता पाहू’ अशी विनवणी शेतकरी करत आहेत, तर माजी आमदार पंडित पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
गुढीपाडव्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने शेतीमालाला उठाव मिळाला नाही. लग्नसराई न झाल्याने, तसेच बाजारपेठा, हॉटेल बंद असल्याने, डाळी, कडधान्ये यासह फुले, भाजीपाला, नारळ यांना उठाव नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शहरात रोजगारासाठी गेलेली मंडळी रोजगार ठप्प झाल्याने गावी आल्याने, ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरी हिंमत न हारता शेतकऱ्याने खरिपाच्या पेरणीची तयारी केली, पण निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणात बसला.येथील आंबा, काजू, नारळ, सुपारी पिकविणारा शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला. वाडवडिलांनी मोठ्या केलेल्या बागा नष्ट झाल्या. शासनाचे पाहणी दौरे झाले, तुटपुंजी मदत मिळाली. अजून अनेकांना ती मिळालेली नाही. उद्ध्वस्त घरे, शेती, बागा यांचे दु:ख सावरत कोकणात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. पर्जन्यमान मागील चार महिने बऱ्यापैकी असल्याने भाताचे पीक हाती येईल, अशी आशा होती, पण गेला आठवडाभर झालेल्या पावसामुळे भाताचे पीक मातीमोल झाले आहे. भाताचे पीक कापणे व त्याची मळणी करण्याचा खर्चदेखील निघणार नाही, अशी शेतक ऱ्यांची भयावह परिस्थिती आहे.