संत्र्यानंतर आता नाशपाती, हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली तस्करी, मुंबई डीआयआय विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:42 PM2022-10-08T18:42:32+5:302022-10-08T18:43:18+5:30
हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली तस्करी करण्यात आली असून मुंबई डीआयआय विभागाने कारवाई केली आहे.
मधुकर ठाकूर
उरण (रायगड) : याआधी संत्र्याच्या आडून १४७६ कोटी अमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती, हिरवी सफरचंदाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये ५०० कोटीहुन अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जेएनपीए बंदरात मुंबई डीआयआय विभागाने कारवाई केली अशी माहिती डीआरआय सुत्रांनी दिली.
याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच एजन्सीने संत्र्यांच्या एका खेपेतून १९८ किलो मेथ आणि ९ किलो कोकेन असा १४७६ कोटी किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी व गुप्त खबऱ्याकडून मुंबईच्या डीआयआय विभागाच्या अधिकाऱ्यांना पक्की खबर मिळाली होती.या माहितीच्या आधारे डीआयआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (६) जेएनपीए बंदरातून दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेल्या नाशपाती आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणारा कंटेनर अडवला. कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये उच्च गुणवत्तेच्या कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे एक किलो वजनाच्या मोठ्या प्रमाणात विटा लपविल्याचे निदर्शनास आले.अधिक तपासणी केल्यानंतर कोकेनच्या ५०.२३ किलो वजनाच्या ५० विटा जप्त करण्यात आल्या आहेत. या अमली पदार्थांच्या साठ्याची किंमत ५०२ कोटी असल्याची माहिती एका डीआयआय अधिकाऱ्यांनी दिली.