अलिबाग : पूर्वी मराठी सिनेमा हा धर्म होता, आता तो धंदा झालाय. त्यामुळे तो टिकवायचा असेल तर धर्म म्हणूनच या व्यवसायाकडे पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. अलिबाग येथल पीएनपी नाट्यगृहात शोध मराठी मनाचा हे मराठी जागतिक संमेलन २०२० सुरू आहे. मराठी सिनेमा आणि नाटक या परिसंवादात रामदास फुटाणे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, चित्रपट निर्माते मेघराज भोसले यांनी मराठी नाटक, सिनेमाला उज्ज्वल भवितव्य असल्याचे सांगितले. महेश म्हात्रे आणि विजय चोरमारे यांनी या तिन्ही मान्यवरांना बोलते करीत उपस्थितांना संवादाची चांगली मेजवाणी दिली.मराठी सिनेमा, नाटकाला यश मिळवायचे असेल तर त्यातील अभिनेते, अभिनेत्री कोण आहेत यापेक्षा त्या नाटक, सिनेमाचा लेखक कोण आहे यावरच त्या सिनेमा, नाटकाचे यश अवलंबून असते असेही फुटाणे यांनी सांगितले. अतिशय बोलक्या आणि मार्मिक शैलीत त्यांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. ‘सामना’ या सिनेमाची निर्मिती करताना आलेले अनुभवही त्यांनी कथन केले. या सिनेमाची कथा विजय तेंडूलकर यांनी लिहिल्याने तो यशस्वी झाला, असा दावाही फुटाणे यांनी केला. या सिनेमात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या मध्यवर्ती भूमिका नजरेसमोर ठेवत तेंडूलकरांनी या सिनेमाचे लेखन केले होते. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यानंतरच महाराष्ट्रात सामना तुफान चालल्याचा दावा फुटाणे यांनी केला. सिनेमा, नाटक निर्माण करणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. एकतर सिनेमासाठी कर्ज घेतले असेल तर ते त्याचसाठी वापरले जावे, नाही तर भिकेला लागल्याशिवाय राहत नाही, अशी मार्मिक टिपणीही त्यांनी केली. सिनेमा, नाटक हे अंगात असले पाहिजे, ते जर नसेल तर पूर्वी सिनेमा किंवा नाटकाकडे सर्व जण धर्म-संस्कृती म्हणून पाहायचे; पण आता त्याचा धंदा झाल्याची खंतही फुटाणे यांनी व्यक्त केली.आजच्या चित्रपट निर्मात्यांवरही रामदास फुटाणे हे आपल्या शैलीत आसूड ओढायला विसरले नाहीत. या दोन्ही क्षेत्रात दिग्दर्शकांची एक टोळीच निर्माण झाली आहे. ती नेहमी निर्मात्यांसाठी गळ टाकून बसलेली असते. एखादा निर्माता मिळाला की त्याला खड्ड्यात घालण्याचे काम ही मंडळी करीत असल्याबद्दलही फुटाणे यांनी नाराजी व्यक्त केली.फुटाणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत मराठी सिनेमा, नाटकाच्या वृद्धीसाठी काहीही मदत केली नसल्याचे सांगितले. त्यापेक्षा शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात मराठी सिनेमा, नाटक, अन्य संमेलने यांना सरकारकडून भरीव अर्थसाहाय्य मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनासाठी फडणवीस सरकारने पाच वर्षांपूर्वी पाच लाखांचा निधी मंजूर केला होता; परंतु तो निधी आजतागायत मिळाला नसल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तो निधी मिळूच नये म्हणून मंत्रालयात अधिकाऱ्यांचा एक गट कार्यरत असल्याचेही त्यांनी सूचित केले.मराठी नाटक, सिनेमा टिकवायचा असेल तर राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री हे ध्येयवादी असावे लागतात, असे रामदास फुटाणे म्हणाले.>सिनेमागृहांची संख्या घटतेय - मेघराज भोसलेराज्यातील सिनेमागृहांची संख्या घटत असल्याची खंत निर्माता, दिग्दर्शक मेघराज भोसले यांनी व्यक्त केली. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन जिथे जिथे शक्य आहे. अशा ठिकाणी छोट्या छोट्या सिनेमागृहांची निर्मिती करावी, अशी मागणी भोसले यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने केली.मराठी सिनेमाचा ग्रामीण प्रेक्षक दुरावत असल्याचेही त्यांनी सांगितले. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा पाहणे हे ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अशक्य आहे. यासाठी मराठी नाट्य परिषदेने फडणवीस सरकारशी चर्चा करून उपाय करण्याचे सुचविले होते.तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही जिथे जिथे एसटी आगाराचे नूतनीकरण केले जाईल, तेथे सिनेमागृहासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते; पण ते आश्वासन प्रत्यक्षात काही उतरले नाही, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली. मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्राइम टाइमलाच प्रक्षेपित करावा, याासाठी मराठी चित्रपट महामंडळ सरकार दरबारी प्रयत्न करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सिनेमाकडे धर्म म्हणूनच पाहणे गरजेचे- रामदास फुटाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:51 AM