प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक - जिल्हाधिकारी किशन जावळे
By निखिल म्हात्रे | Published: March 18, 2024 07:26 PM2024-03-18T19:26:20+5:302024-03-18T19:26:38+5:30
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा रुपये दोन हजारांपर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रिंटर, प्रकाशक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह जिल्ह्यातील मुद्रक उपस्थित होते.
या बैठकीत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१' च्या 'कलम १२७ क' व्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
हाताने नक्कल काढण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकी संबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तिला व्यक्तिश: ओळखतील अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रती मध्ये) घेणे अत्यावश्यक आहे असे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सांगितले. तसेच दस्तऐवज छापण्यात आल्यावर मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादींच्या चार प्रती संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तीन दिवसाच्या आत सादर कराव्यात. या सर्व प्रती मिडीया सेल मधील कक्षात जमा कराव्यात.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा रुपये दोन हजारांपर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात अशी तरतूद या नियमात असल्याचेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले.