अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर आदी उपस्थित होते.
पोस्टल व होम वोटिंगद्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक करावे. सी-व्हिजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सह नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता बाळगावी, अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या.
निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची ( होम वोटिंग)सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. दिव्यांग मतदारांचे 100% मतदान होईल या दृष्टीने काम केले जावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात.
विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी.अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदान दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड याद्वारे निर्माण करण्यात याव्यात, दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्था ची मदत घेतली जावी. होम वोटिंग साठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घेतली जावी. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात 62% मतदान झाले होते यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी असे किशन जावळे म्हणाले.