म्हसळा : गेली दहा वर्षे खासदार म्हणून निवडून जाऊन दिवेआगर हे गाव दत्तक घेऊन फक्त चारच सार्वजिक मोऱ्या बांधण्याचे काम विद्यमान खासदारांनी केलेय, तर सुनील तटकरे हे सत्तेत नसतानाही सत्ताधाऱ्यांकडून विकास निधी खेचून आणण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षांत फक्त दिवेआगरसाठी तटकरे यांनी अडीच कोटींचा निधी आणला आहे, तर श्रीवर्धन मतदारसंघासाठी किती आणला याची आपण कल्पनाच करू शकत नाही, असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले आहे.
दिवेआगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात सोमवारी सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार अनिकेत तटकरे बोलत होते. ज्या वास्तूत ही सभा होतेय ती वास्तू गेली दहा वर्षे अपूर्ण अवस्थेत पडून होती, त्या वास्तूला पूर्ण करण्यासाठी खासदारांना निधी देता आला नाही. मात्र, सुनील तटकरे यांनी ही इमारत पूर्ण करण्याकरिता ५० लाख रु पये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले. आ. अनिकेत तटकरे यांचा बोर्ली पंचतन गटाचा दौरा होता. छोटेखानी बैठकांवर त्यांनी जोर दिला होता. घरबैठकांनाही सुमारे २५० ते ३०० कार्यकर्ते उपस्थित होते. दिवेआगर येथे झालेल्या बैठकीत सरपंच उदय बापट, लाला जोशी, सचिन किर, महमद मेमन, बबन सुर्वे, मंदार तोडणकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते. बोर्ली पंचतन गटात कारले, खुजार, बोर्लीपचंतन, कपोली शिस्ते, वडवली, दिघी, वेळास आदी गावांतून आ. अनिकेत तटकरे यांनी बैठका घेतल्या.