पनवेल :प्रत्येक वेळी घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून ठाकरे सरकार राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूल मंत्री चंद्रकांतपाटील यांनी आज (दि. २६) येथे केली. त्याचबरोबर 'अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है' असा नारा देत महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका व शहर मंडल शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, विनोद साबळे, कामोठे अध्यक्ष रविन्द्र जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर उपस्थित होते. बैठकीस लोकप्रतिनिधी आणि शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मान दिला मात्र ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे पण ठाकरे सरकारचे त्याकडे का? दुर्लक्ष होत आहे असा सवाल करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना करुणा शर्मा यांचा टाहो का ऐकायला येत नाही आणि पूजा चव्हाणला न्याय का देत नाही असा प्रतिसवालही त्यांनी केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना कशाप्रकारे खंडणी वसुली करायला सांगतात याचे परमवीर सिंह यांनी आठ पानी पत्रातून जाहीर केले आहे मात्र तरी सुद्धा हे सरकार गृहमंत्री आणि सचिन वाझेला वाचविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहे आणि हे संपूर्ण देश पाहत आहे. कोरोना नियंत्रण, महिलांवरील अत्याचार, सर्वसामान्यांचा विचार, गुन्ह्यांना आळा, घोटाळ्यांमध्ये वाढ, अशा चारी बाजूने या सरकारला अपयश आले आहे, असे सांगतानाच अनिल देशमुख, सचिन वाझेला वाचविण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली, असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन कोटी स्वयंसेवक आहेत. कार्यकर्ते ध्वजाला वंदन करून समर्पण आणि गुरुदक्षिणा देतात. यातून तळागाळात सामाजिक कार्य केले जाते. असे सांगून नाना पटोले यांचे नाव घेत हप्ता आणि खंडणी घेणाऱ्यांना समर्पण आणि गुरुदक्षिणा काय कळणार असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर कोरोनात मातोश्रीवर बसून गरम पाणी पिण्याचे सल्ले देणारे लोकांच्यात कधीच आले नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमपणाच्या चिंधड्या उडविल्या.यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून कोरोना काळात भाजपने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा अहवाल मांडला.