Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:39 AM2023-07-20T10:39:23+5:302023-07-20T10:39:49+5:30

Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावणाऱ्या आजीबाईंनी काल रात्री काय घडलं, त्या प्रसंगाचा भयावह अनुभव कथन केला आहे. 

'It rained a lot, the mountain collapsed, under it, my...' Grandmother mourned | Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर

Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर

रायगडमधील खालापूरजवळ असलेल्या इर्शाळवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून त्याखाली अनेक घरं गाडली गेल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण अद्याप ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावणाऱ्या आजीबाईंनी काल रात्री काय घडलं, त्या प्रसंगाचा भयावह अनुभव कथन केला आहे. 

आप्तांना गमावल्याने शोक अनावर झालेल्या या आजींची प्रसारमाध्यमांनी विचारपूस केली असता त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रात्री आम्ही झोपेत असताना काय झालं आम्हाला कळलंच नाही. दरडीखाली आमची माणसं सापडली. काल पाऊस खूप पडला. मातीचा डोंगर कोसळला, त्याचे खाली माझी घरं बुडून गेली. त्या मातीखाली माझी मुलं चेपली गेली, असं त्यांनी सांगितलं.

तर आणखी एका रहिवाशाने सांगितले की, रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला. त्यामुळे आम्ही घाबरलो. तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो.  

या दुर्घटनेबाबत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीपासून पालकमंत्री या नात्याने मी स्वत: आणि प्रशासन घटनास्थळी आहोत. आतापर्यंत २६ लोकांना रेस्क्यू केले आहे. त्यातील ४ मृत आहेत. जखमींना नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काळोख असल्याने काही वेळ रेस्क्यू थांबले होते. आता पुन्हा पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असं त्यांनी सांगितले.

रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. रसायनी येथील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. या वस्तीपर्यंत जाण्यासाठी खूप कठीण रस्ता आहे. जवळपास २ तास वरती पोहचायला लागले. आम्ही मदतीसाठी वर पोहचताना माझ्यासमोर बेलापूर येथील अग्निशमन दलातील एक कर्मचारी वाटेतच कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. याठिकाणी ५०-६० घरांची वस्ती आहे. आम्ही इथं ट्रेकला यायचो. आता याठिकाणी केवळ १०-१२ घरे उरल्याची दिसून येते. बाकी काहीच दिसत नाही असं मदतीसाठी आलेल्या तरूणांनी म्हटलं.

Web Title: 'It rained a lot, the mountain collapsed, under it, my...' Grandmother mourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.